कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी एक अत्यंत आनंददायी आणि प्रेरणादायक बातमी आहे. राज्य सरकारने मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत, आता ८४२ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.
राज्यातील महिला सक्षमीकरण आणि उच्च शिक्षणाचा प्रसार हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून सरकारने हे पाऊल उचललं आहे. यामुळे आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अपूर्ण राहणाऱ्या अनेक मुलींना मोठा दिलासा मिळणार आहे. अभियांत्रिकी, फार्मसी, व्यवस्थापन, कायदा, कृषी, समाजकार्य, शिक्षण इत्यादी अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम या योजनेत समाविष्ट आहेत.
शैक्षणिक संस्थांना प्रथम ‘इतर शुल्क’ कमी करण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत. याला प्रतिसाद न मिळाल्यास, ही शुल्के पूर्णपणे माफ करण्यासाठी कायदेशीर प्रारूप तयार केले जाईल. यामुळे मुलींना आर्थिक अडचणींशिवाय उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळेल आणि महिलांचे शिक्षणातील प्रमाण वाढेल.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ‘विकास शुल्क’, ‘प्रयोगशाळा शुल्क’ यासारख्या ‘इतर शुल्कां’पासूनही विद्यार्थिनींना मुक्त करण्याची योजना आखली आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल, ओबीसी, ईडब्लूएस आणि एसईबीसी प्रवर्गातील मुलींना शिक्षण घेणे अधिक सुलभ होईल, अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.



