मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
‘ लाडकी बहीण योजने ’ ला राज्यभरातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आता शिवसेना शिंदे गटाकडून ‘ लाडकी सूनबाई योजना ’ राबवली जाणार आहे. रविवारी ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
योजनेची वैशिष्ट्ये :
-
प्रत्येक शिवसेना शाखा व विभागीय कार्यालयांमार्फत मदत केली जाणार.
-
हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला असून, सुनांवर अन्याय किंवा घरगुती हिंसाचार झाल्यास त्या या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. तक्रारींवर तातडीने कार्यवाही होईल.
-
या उपक्रमामधून सासू-सून संबंध अधिक घट्ट व सन्मान्य व्हावेत, याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.
-
ज्या सासू आपली सून मुलगी म्हणून सांभाळतात, त्यांच्या सकारात्मक उदाहरणांनाही जनजागृती अभियानात स्थान दिले जाणार आहे.
राज्यव्यापी मोहीम
ही योजना केवळ ठाणेपुरती मर्यादित न राहता राज्यभर राबवली जाणार आहे. सुनांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी मानसिक आधार, समुपदेशन आणि कायदेशीर मदतही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
नेतृत्व व जबाबदारी
या योजनेचा राज्य समन्वयक पदभार ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना देण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले की, “जशी मुलगी लाडकी असते तशीच सून देखील लाडकी असावी, हे समाजाने ओळखले पाहिजे. योजनेमुळे घराघरात सौहार्दाचे वातावरण निर्माण होईल.”
लाडकी बहीण नंतर आता लाडकी सूनबाई योजने मुळे महिलांच्या सन्मान व सुरक्षिततेसाठी आणखी एक ठोस पाऊल उचलले गेले आहे. घरगुती हिंसाचाराविरोधात महिलांना तातडीची मदत मिळणे, तसेच सासू-सून संबंध सुदृढ होणे, हेच या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.
———————————————————————————————