कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
आज, १६ ऑगस्ट, लोककवी नारायण गंगाराम सुर्वे यांचा स्मृतिदिन. मराठी साहित्यविश्वात कामगार, दलित, उपेक्षित आणि संघर्ष करणाऱ्या जनतेचा आवाज बनलेले सुर्वे हे खऱ्या अर्थाने लोककवी होते. आपल्या कवितेतून समाजपरिवर्तनाचे स्वप्न मांडणारे, श्रमिक आणि सामान्य माणसाच्या जगण्याला शब्द देणारे ते एक प्रखर कवी होते.
जीवन आणि संघर्ष
नारायण सुर्वे यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९२६ रोजी झाला. परंतु ते जन्मतःच अनाथ होते. चिंचपोकळी येथील इंडिया वुलन मिलमध्ये काम करणारे गिरणी कामगार गंगाराम सुर्वे यांनी गिरणीसमोर रस्त्यावर पडलेले हे बालक उचलून घेतले. गिरणीतच काम करणाऱ्या काशीबाई सुर्वे यांनी या बाळाला स्वतःच्या मुलासारखे जपले आणि त्याला नारायण गंगाराम सुर्वे असे नाव दिले.
त्यांचे बालपण परळच्या बोगद्याच्या चाळीत गेले. अठराविश्वे दारिद्र्य, परंतु शिकण्याची जिद्द प्रखर होती. दादर-अप्पर माहीम येथील महापालिका शाळेतून चौथीपर्यंत शिक्षण घेतले आणि पुढील शिक्षण स्वतःच्या कष्टाने पूर्ण केले. अनाथपण, दारिद्र्य आणि संघर्ष यांच्या छायेतूनच त्यांच्या कवितेचा आत्मा आकारला गेला.
कवितेतला मार्क्सवादी दृष्टिकोन
सुर्वे यांच्या कवितांवर मार्क्सवादी विचारसरणीचा ठसा उमटलेला होता. वर्गसंघर्ष, कामगारांचे जीवन, उपेक्षितांचे दुःख आणि शोषणाविरुद्धचा रोष हे त्यांच्या कवितेचे केंद्र होते. त्यांच्या कवितेत ‘याकूब’, ‘नालबंदवाला’, संपकरी, पोस्टर्स चिकटवणारा हमाल, वेश्या अशा समाजातील वंचित पात्रांचा वास्तववादी आलेख दिसतो.
त्यांच्या कवितेत सजावट नव्हती, तर संवाद होता; शब्दांची झळाळी नव्हती, तर जगण्याचा उकाडा होता. त्यामुळे त्यांची कविता सर्वसामान्य वाचकाला थेट भिडते.
काव्य संग्रह – ऐसा गा मी ब्रह्म, जाहीरनामा, नव्या माणसाचे आगमन, पुन्हा एकदा कविता, माझे विद्यापीठ, सनद
“दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली “
म्हटलं तर किती साध्या ओळी आहेत; पण जगण्याची किंमत देऊन एक ओळ उमटते तेव्हा त्याचं मोल कशातच करता येत नाही. सुर्वेंनी आत्ममश्गूल सारस्वतांना सुनावलं आणि ‘त्यांच्या विद्यापीठा’त यायला लावलं. त्यांचं विद्यापीठ खूप मोठं होतं म्हणूनच त्यांना गटे, मार्क्स ते नेहरु अगदी फाटकावरच भेटू लागले. सुर्वेंचा ‘जाहीरनामा’ सर्वसामान्य माणसाचा आहे. कामगाराचा आहे. ‘नाही रे’ वर्गाचा आहे. त्यात अभिनिवेश नाही. त्यात प्रामाणिक तळमळ आहे.
सुर्वे आधी चांगला माणूस होते आणि चांगला माणूस असणं ही चांगल्या कवीची पूर्वअट असते. सुर्वे मास्तरांना सलाम करतानाच त्यांनी जपलेल्या मूल्यनिष्ठतेची आठवण ठेवायला हवी. इ.स. १९९८ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले. महाराष्ट्र शासनासह अनेक साहित्यिक संस्थांनीही त्यांचा सन्मान केला.
नारायण सुर्वे हे केवळ कवी नव्हते, तर तळागाळातील संघर्षांचे प्रतिनिधी होते. त्यांनी कवितेला सौंदर्यापेक्षा संघर्षाचं, वास्तवाचं आणि परिवर्तनाचं साधन मानलं. आज त्यांच्या स्मृतिदिनी आपण त्यांना आदरांजली वाहतो आणि त्यांच्या लेखणीतील ज्वाला पुन्हा स्मरतो.
——————————————————————————————————-



