कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
‘मी अजून त्या जबाबदारीस पात्र नाही.’ असे नम्रपणे सागून मुख्यमंत्री पदाची ऑफर नाकारणारा राज्यातील एकमेव नेता कोण असेल हे अनेकजणांना माहित नसेल. हा नेता दुसरा तिसरा कोणी नसून आपले आबाच होते. आजकाल मोठी पदे मिळण्यासाठी नेतेमंडळी आटापीटा करतात. मुख्यमंत्री तर राज्यातील सर्वोच्च पद. या पदासाठी तर कित्येक नेते दिल्ली वाऱ्या करून चपले झिजवतात. पण शेवटी त्यांची निराशा होते. ग्राम स्वच्छता अभियान, तंटा मुक्ती अभियान असे लोकांच्या जीवनाशी निगडीत उपक्रम प्रभावीपणे राबविल्यामुळे आणि सामान्य लोकांच्यात सहज मिसळण्याची हातोटी असल्यामुळे आबा हे फक्त अंजनीचे आबा राहिले नाहीत तर ते राज्याचे आबा झाले. आबांची आज- १६ ऑगस्ट जयंती. यानिमित्त त्यांच्याविषयी…
“आबा” या नावाने प्रसिद्ध असलेले आर.आर. पाटील यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५७ रोजी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील आंजणी गावात झाला. रावसाहेब रामराव पाटील हे आबांचे पूर्ण नाव मोजक्या लोकांनाच माहित असेल. ते जास्त करून आर आर आबा नावानेच परिचित होते. आबांचे वडील गावप्रमुख असूनही त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. “कमवा आणि शिका” या योजनेअंतर्गत आबांनी आपले बहुतांश शिक्षण पूर्ण केले. त्यांनी सांगलीच्या शांतीनिकेतन कॉलेजमधून बीए आणि एलएलबी पर्यंतचे शिक्षण घेतले.
आबा १९७९ ते १९९० पर्यंत सांगली जिल्हा परिषद सदस्य होते. तासगाव विधानसभा मतदारसंघातून १९९० साली आबा प्रथम आमदार म्हणून निवडून आले. त्या नंतर १९९५, १९९९ , २००४, २००९, २०१४ सलग सहा निवडणुका जिंकत त्यांनी तासगाव विधान सभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. आबा १९९६-९७ व १९९८-९९ या काळात काँग्रेसचे विधानसभा मुख्य व्हीप आणि लोकलेखा समितीचे अध्यक्ष होते. शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर १९९९ साली ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश अध्यक्ष म्हणून काम पाहिले.
आर. आर. पाटील ज्यांना प्रेमाने “आबा” म्हणत असत, हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रामाणिक, लोकप्रिय आणि संयमी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचे संपूर्ण राजकीय जीवन साधेपणा, शिस्त आणि जनतेच्या हितासाठी झटणारे होते. त्यांचे आयुष्य काही भन्नाट किस्स्यांनी भरलेले आहे.
मुख्यमंत्रीपद नाकारले : विधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी पुन्हा सत्तेवर आले होते. कॉंग्रेस पेक्षा राष्ट्रवादीचे जास्त उमेदवार निवडून आले होते. यामुळे राष्ट्रवादी पक्ष मुख्यमंत्री पदाचा दावेदार होता. यावेळी शरद पवारांनी आर. आर. पाटील यांना मुख्यमंत्री पद देण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु पाटील यांनी नम्रपणे तो प्रस्ताव नाकारला आणि म्हणाले, मी अजून त्या जबाबदारीस पात्र नाही. असे सांगून आबांनी विनम्रपणे मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव नाकारला.
साधेपणा : त्यांच्या साधेपणाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. मंत्री झाल्यावरही ते स्वतःची स्कूटर चालवत मंत्रालयात यायचे. त्यांच्या घरीही फारशा सरकारी सोयी नव्हत्या. सांगळे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात दौराअसेल तेव्हा ते वेळ काढून मूळ गावी आंजणी मध्ये राहायचे.
‘गाव तिथे नळ योजना’ : आबांनी त्यांच्या मतदारसंघात आणि ग्रामीण भागात पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी ‘गाव तिथे नळ’ योजना राबवली, ज्यामुळे हजारो गावांमध्ये घराघरांत नळाद्वारे पाणी पोहोचले.
दारूबंदी : गृहमंत्री असताना आबांनी अनेक ठिकाणी दारूबंदी लागू केली. त्यांचा विश्वास होता की गावचा विकास होण्यासाठी व्यसनमुक्ती आवश्यक आहे. यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी स्वतः गावकऱ्यांशी संवाद साधून मोहीम राबवली.
खरं तर ग्रामविकास हे खात महत्त्वाचे असूनही दुर्लक्षित होते. या खात्याला आबांनी वलय प्राप्त करून दिले. आबा ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर त्यांनी संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरु करून ते अतिशय प्रभावीपणे राबविले. यामुळे महाराष्ट्रातून हागणदाऱ्या हद्दपार झाल्या. प्रत्येक घरात शौचालयाची सोय झाली. याचबरोबर गाव स्वच्छतेच्या स्पर्धा आयोजित करून बक्षिसही सुरु केले. यामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी गावं चकाचक झाली. आबांनी तंटा मुक्ती अभियानही प्रभावीपणे राबविले. या अभियानामुळे पोलिसांवरील आणि न्यायालयीन कामावरील ताण काही प्रमाणात कमी झाला. शिवाय नागरीकांचा वेळ आणि पैसा वाचला. अशा कामामुळे आर आर आबा आजही आपल्यासोबत आहेत असे वाटतात.
—————————————————————————————–