नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
फिलिपाईन्स आणि भारतीय नौदलाने राष्ट्रपती फर्डिनांड मार्कोस ज्युनिअर यांच्या भारत दौऱ्याच्या अगोदर इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील पश्चिम फिलिपिन्स समुद्रात संयुक्त नौदल सराव केला. हा भाग “ दक्षिण चीन समुद्राच्या विस्तीर्ण पाण्यातील आणि चीनने दावा केलेला परिसर ” म्हणून ओळखला जातो, मात्र अनेकांच्या मते हा सराव फिलिपाईन्सच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन ( EEZ ) मध्ये झाला असून चीनच्या मुख्य भूमी पासून तो हजारो किलोमीटर दूर आहे.
या चर्चेत फिलिपाईन्सचे माजी परराष्ट्रमंत्री आणि ब्रिटनमधील सध्याचे राजदूत टिओडोरो ‘टेडी बॉय’ लोपेझ लोसिन ज्युनिअर यांनी भारतीय नौदलाचे भरभरून कौतुक केले. त्यांनी ‘एक्स’वर लिहिले “ भारतीय नौदल हे एकमेव नौदल आहे ज्यात हवे तिथे जाण्याचे धाडस आहे. यावेळी त्यांनी पश्चिम नौदलावर निशाणा साधत पाश्चिमात्य नौदल कॅस्ट्रॅटीसारखे अकॅपेला गाते.” येथे ‘कॅस्ट्रॅटी’ हा उल्लेख त्या पुरुष गायकांसाठी आहे जे यौवनाआधी नपुंसक केले जाऊन चर्च किंवा ऑपेरा हाऊसमध्ये उच्च स्वरात गायन करतात.
या सरावाबाबत आणखी एका एक्स युजरने सांगितले की, फिलिपाईन्सच्या EEZ मध्ये भारत-फिलिपाईन्स गस्ती हा पहिलाच प्रसंग नाही. यापूर्वी २०२१ मध्येही पश्चिम फिलिपिन्स समुद्रात दोन्ही नौदलांनी असा संयुक्त सराव केला होता.
विश्लेषकांच्या मते, हा सराव प्रादेशिक सुरक्षेसाठी, सागरी मार्गांचे स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी आणि चीनच्या वाढत्या सागरी दाव्यांना प्रतिकार करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरतो. भारत आणि फिलिपाईन्स यांच्यातील संरक्षण सहकार्य अलीकडच्या वर्षांत वाढत असून, या सरावामुळे दोन्ही देशांच्या नौदल क्षमतांमध्ये आणि समन्वयात आणखी मजबुती येणार आहे.
—————————————————————————————-