Railway Minister Ashwini Vaishnav has given a glimpse of India's first hydrogen train from 'X'. The train, which is likely to be named 'Namo Green Rail', is starting a new chapter in eco-friendly and indigenous technology.
नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भारतीय रेल्वेने भविष्याकडे एक मोठी झेप घेतली असून, डिझेल इंजिनांचा धूर आणि विजेच्या तारांचे जाळे लवकरच इतिहासजमा होणार आहे. भारतातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनची झलक रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘X’ वरून दाखवली आहे. ‘नमो ग्रीन रेल’ असे संभाव्य नाव असलेल्या या ट्रेनमुळे पर्यावरणपूरक आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा नवा अध्याय सुरू होत आहे.
जगातील पाचव्या देशाच्या यादीत भारत
जर्मनी, फ्रान्स, स्वीडन आणि चीननंतर हायड्रोजन ट्रेन धाववणारा भारत हा जगातील पाचवा देश ठरणार आहे. यामुळे भारताने चीनला मागे टाकत जागतिक हायड्रोजन तंत्रज्ञान क्षेत्रात आपली भक्कम उपस्थिती नोंदवली आहे.
तंत्रज्ञानाची खासियत
चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे यशस्वी चाचणी झालेली ही १,२०० अश्वशक्तीची ट्रेन पूर्णपणे भारतात विकसित झाली आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या संयोगातून वीज निर्माण करणारे हे ‘शून्य उत्सर्जन’ तंत्रज्ञान केवळ पाणी बाहेर टाकते. त्यामुळे कार्बन डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइडसारखे हानिकारक वायू उत्सर्जित होत नाहीत.
आधुनिक डिझाइन आणि प्रवासी सुविधा
ड्रायव्हिंग कोचचे बाह्य व आतील डिझाइन वंदे भारतची आठवण करून देणारे आहे. डिजिटल आणि संगणकीकृत केबिनमध्ये मोठी स्क्रीन असून ती विमानाच्या कॉकपिट सारखी दिसते. प्रवासी कोचही आरामदायी व अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असतील.
पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेला बळ
ही ट्रेन भारताला २०७० पर्यंत ‘नेट झिरो’ उत्सर्जनाच्या लक्ष्याकडे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. हायड्रोजन तंत्रज्ञानामुळे तेल आयातीवरील अवलंबित्व कमी होईल, परकीय चलनाची बचत होईल आणि दीर्घकाळात प्रवासाचा खर्चही डिझेलपेक्षा कमी होईल. तसेच डिझेल इंजिनांप्रमाणे गोंगाट न करता शांत व आरामदायी प्रवास देईल.
भारतीय रेल्वेचा हा उपक्रम केवळ पर्यावरणपूरक वाहतुकीकडे मोठे पाऊल नाही, तर ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने तंत्रज्ञानातील मोठा विजय आहे.