‘तांबव्याचा विष्णूबाळा’ पुन्हा रुपेरी पडद्यावर

सयाजी शिंदेच्या दमदार भूमिकेची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

0
194
Poster of the film 'Tambavacha Vishnubala' starring actor Sayaji Shinde in the lead role
Google search engine
सातारा : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
गेल्या अनेक वर्षांपासून मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने नव्या चित्रपटाची घोषणा करत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ या सत्यकथेवर आधारित भव्य चित्रपटातून ते पुन्हा रुपेरी पडद्यावर अवतरणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या तांबवे गावातील विष्णू बाळा पाटील यांच्या संघर्षमय जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. गावच्या भाऊबंदकीतून आणि श्रेयवादातून सख्ख्या चुलत भावांमध्ये विकोपाला गेलेला वाद, त्यातून कुटुंबावर झालेला अन्याय, आणि त्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी विष्णूबाळाने केलेला रक्तरंजित संघर्ष  हा सगळा थरार या चित्रपटातून उलगडणार आहे. या मध्यवर्ती भूमिकेत सयाजी शिंदे आपली ओळख असलेला दमदार अभिनय साकारणार आहेत.
विश्वविनायक सिनेमॅटिक सफारी फिल्म एलएलपी प्रोडक्शन’ च्या बॅनरखाली हा चित्रपट साकारला जात असून, लेखन अरविंद जगताप, दिग्दर्शन अनुप जगदाळे आणि निर्मिती मनोहर जगताप यांची आहे. हा चित्रपट मराठीसोबत हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.
‘साताऱ्यातील ग्रामीण भागात घडलेल्या या सूडनाट्याचा थरार जनसामान्यांना अचंबित करणारा ठरणार आहे,’ असा विश्वास सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला. तर ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटानंतर दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणाले, ‘काहीतरी नवीन आणि वेगळा अनुभव देणारा चित्रपट करायचा होता. सयाजी शिंदे यांच्या साथीने ही सत्यकथा भव्यदिव्य स्वरूपात मांडण्याची कल्पना सुचली. दमदार कथाविषय आणि प्रभावी कलाकार यांची सांगड या चित्रपटातून पाहायला मिळेल.’
२००१ साली आलेल्या ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ या चित्रपटातही सयाजी शिंदे प्रमुख भूमिकेत होते आणि त्या वेळीही चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता नव्या कलाकारांच्या संचासह आणि अधिक भव्य रूपात ही कथा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होत आहे.

——————————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here