कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
नवी दिल्ली येथील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनानुसार श्री अंबाबाई मंदिराच्या गर्भगृहाची स्वच्छता तसेच इतर आवश्यक सूचना आज १३ ऑगस्ट रोजी त्यांच्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात आल्या. यामुळे उद्या गुरुवार, दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी धार्मिक विधी पार पडल्यानंतर भाविकांसाठी श्री अंबाबाई देवीचे दर्शन पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर व श्री पूजक यांनी दिली आहे.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्ती सुस्थितीत राहावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा प्रशासक, देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर यांच्या वतीने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, नवी दिल्ली यांना मूर्तीची पाहणी करण्याचे कळविण्यात आले होते. त्यानुसार विभागातील तज्ज्ञ सोमवारी ( दि. ११ ऑगस्ट ) रात्री कोल्हापुरात दाखल झाले आणि रात्री उशीरा मूर्तीची भिंगाद्वारे पाहणी केली.
मंगळवारी ( दि. १२ ऑगस्ट ) सकाळी मूर्तीच्या संवर्धन प्रक्रियेला सुरुवात झाली. केंद्रीय पुरातत्व विभागाचे उपअधीक्षक डॉ. विनोदकुमार, निलेश महाजन, सुधीर वाघ आणि मनोज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली रासायनिक पद्धतीने मूर्ती स्वच्छ करण्यात आली. प्रक्रियेनंतर मूर्तीवरील पांढरे ठिपके दूर झाले, पाषाणाचा मूळ नैसर्गिक रंग उजळून दिसू लागला आणि बारकावे अधिक स्पष्ट झाले. या प्रक्रियेनंतर मूर्ती अधिक रेखीव दिसत असल्याची माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.
गेल्या दोन दिवसांपासून गाभारा बंद ठेवण्यात आल्याने भाविकांना उत्सवमूर्ती व देवीतत्त्व कलश पेटी चौकात दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. आज ( दि. १३ ऑगस्ट) भारतीय पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार गर्भगृहाची स्वच्छता आणि इतर आवश्यक कामे पूर्ण करण्यात येत आहेत. उद्या गुरुवार, दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी धार्मिक विधी पार पडल्यानंतर दुपारी १२ वाजल्यापासून मूळ अंबाबाई मूर्तीचे दर्शन भाविकांसाठी पूर्ववत खुले होणार आहे.
दरम्यान, तज्ज्ञ समिती संवर्धन प्रक्रियेचा तपशील आणि मूर्तीची सद्यस्थिती याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना सादर करणार आहे. पंढरपूरच्या विठ्ठलमूर्तीच्या धर्तीवर दर सहा महिन्यांनी अंबाबाई मूर्तीची नियमित संवर्धन प्रक्रिया करण्याचा निर्णयही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
——————————————————————————————