नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
देशाच्या नव्या उपराष्ट्रपतीपदासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. विरोधी ‘इंडिया’ आघाडीचे नेते १८ ऑगस्ट रोजी भेटून उमेदवार ठरविण्यासाठी चर्चा करणार आहेत. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे या संदर्भात आघाडीतील नेत्यांशी संपर्क साधत आहेत. निवडणुकीसाठी मतदान आणि मतमोजणी ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट असून, २५ ऑगस्टपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल.
ही निवडणूक विद्यमान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्यानंतर होत आहे. २१ जुलैच्या रात्री त्यांनी १४ व्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. ७४ वर्षीय धनखड यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट २०२७ पर्यंत असणार होता, मात्र त्यांच्या निर्णयामुळे हे पद रिक्त झाले आहे.
दरम्यान, भाजप या पदासाठी आपल्या विचारसरणीशी निष्ठावंत नेत्याला संधी देण्याच्या तयारीत आहे. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत हे सर्वात प्रबळ दावेदार मानले जात असून, सिक्कीमचे राज्यपाल ओम माथूर यांचे नावही चर्चेत आहे.
थावरचंद गेहलोत
७७ वर्षीय गेहलोत हे मध्य प्रदेशातील असून, दलित समाजाचे प्रतिनिधित्व करतात. ते राज्यसभेत सभागृहाचे नेते राहिले आहेत, केंद्रीय मंत्रीपद भूषवले आहे तसेच भाजपच्या संसदीय मंडळाचे सदस्यही राहिले आहेत. त्यांना व्यापक प्रशासकीय अनुभव आहे.
ओम माथूर
७३ वर्षीय माथूर हे राजस्थानचे असून सध्या सिक्कीमचे राज्यपाल आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते गुजरातचे निवडणूक प्रभारी होते. मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. माथूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत.
संसदेत एनडीएचे बहुमत
लोकसभेतील ५४२ सदस्यांपैकी एनडीएकडे २९३ तर ‘इंडिया’ आघाडीकडे २३४ सदस्य आहेत. राज्यसभेतील २४० सदस्यांपैकी एनडीएकडे सुमारे १३० तर ‘इंडिया’ आघाडीकडे ७९ खासदारांचा पाठिंबा आहे. एकूणच एनडीएला ४२३ आणि ‘इंडिया’ आघाडीला ३१३ खासदारांचे समर्थन आहे. उर्वरित खासदार कोणत्याही गटाशी संलग्न नाहीत.
उपराष्ट्रपतीची निवड ‘इलेक्टोरल कॉलेज’ द्वारे केली जाते, ज्यात लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व निवडून आलेले व नामनिर्देशित सदस्य सहभागी होतात. उमेदवाराला किमान २० खासदार प्रस्तावक आणि २० खासदार अनुमोदक म्हणून आवश्यक असतात. मतदानात खासदार पसंतीच्या क्रमाने मत देतात आणि साध्या बहुमताने विजेता निश्चित होतो.
———————————————————————————————