पर्यावरणपूरक उपक्रमात सहभाग नोंदवा

मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांचे आवाहन

0
171
Google search engine
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाच्या नियोजनाबाबत आज जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली. जिल्ह्याच्या या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे दहा वर्ष पूर्ण झाली असून या उपक्रमामुळे लोकांमध्ये झालेला पर्यावरणपूरक वर्तन बदल यावर्षीही टिकवायचा आहे. यासाठी सर्वांनी या उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये सन २०१५ पासून पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. सन २०१५ ते २०२४ या दहा वर्षामध्ये या उपक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा हा उपक्रम राज्यासाठीच नव्हे तर देशासाठी पथदर्शी ठरत आहे. यावर्षी देखील अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने हा उपक्रम यशस्वी करण्याबाबत तसेच जिल्ह्यातील नदी, तलाव, पिण्याच्या पाण्याच्या विहीरी इ. सार्वजनिक जलस्रोतांचे प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सर्व ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या आहेत.
गावामध्ये एक गावं, एक गणपती या संकल्पनेनुसार सार्वजनिक गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करणे, घरगुती गणेशमुर्तीची ‘प्रतिष्ठापना करताना धातुच्या, संगमरवरी, इतर पर्यायी किंवा मातीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करणे, तसेच ‘घरगुती गणेशमुर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करणे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जन स्थळी ( कृत्रीम तलाव, कुंड ) विसर्जन करण्याबाबत गावस्तरावर प्रबोधन करणे, तसेच गावनिहाय मुर्ती संकलन व पर्यायी विसर्जनासाठी ठिकाणे निश्चित करुन त्याबाबत गावस्तरावर प्रसिध्दी करणे.

निश्चित केलेल्या ठिकाणांची स्वच्छता करणे. मुर्ती विसर्जनाकरिता आवश्यक काहीली संख्या किंवा वापरात नसलेल्या पाण्याच्या खणी निश्चित करुन, फेरविसर्जनासाठी दिलेल्या मूर्ती शक्य असल्यास सर्वांच्या अनुमतीने मुर्ती कुंभाराकडे परत देण्याबाबतचे नियोजन करणे, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील १२ मे २०२५ रोजीच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून मूर्ती विसर्जनाबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या असून या मार्गदर्शक सूचनानुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करुन सहा फुटापर्यंत उंचीच्या मुर्ती विसर्जन करण्यासाठी आवश्यक व पुरेशी कृत्रिम तलावांची व्यवस्था उभी करणे, राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी ६ फूट उंची पेक्षा कमी उंचीच्या सर्व मृर्ती विसर्जन हे कृत्रिम तलावातच केले जाईल याबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत बैठकीत सूचित करण्यात आले.
निर्माल्य संकलनासाठी ठिकाण निश्चित करणे, त्याची वाहतूक व्यवस्था व त्याच्या सुयोग्य व्यवस्थापनाकरिता जागेची निश्चिती करणे, निर्माल्यातून येणारे प्लास्टीक वेगळे केले जाईल यासाठी घरातून निर्माल्याचे वर्गीकरण केले जाईल याबाबत आशा, अंगणवाडी सेविका, शालेय विद्यार्थी यांच्यामार्फत जनजागृती करणे अशा सूचना ग्रामपंचायतीना देण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरावरुन या उपक्रमाचे सनियंत्रण केले जाणार आहे. घरगुती गणेश विसर्जनादिवशी जिल्हा परिषद व उपप्रादेशिक कार्यालय, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, कोल्हापूर यांच्या पथकाव्दारे गावामध्ये केलेल्या नियोजनाच्या पाहणीसाठी भेटी दिल्या जाणार आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर आयोजित या बैठकीस तालुक्यातील सर्व गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीव्दारे उपस्थित होते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाबाबत जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक माधुरी परीट यांनी प्रास्ताविक केले. तर पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील डॉ. सुशिल शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
———————————————————————————————-
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here