राज्यात काँग्रेसकडून संघटनात्मक पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दोन दिवसीय काँग्रेस पदाधिकारी कार्यशाळेचा समारोप आज झाला. या कार्यशाळेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चैनिथला यांनी मोदी सरकार, निवडणूक आयोग तसेच महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत स्पष्ट आणि ठळक भूमिका मांडली.
या कार्यशाळेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, अमित देशमुख, नसीम खान, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या कार्यशाळेला अनुपस्थिती दर्शवली.
चैनिथला यांनी कार्यशाळेत बोलताना महाविकास आघाडीबाबत संकेत देत म्हटले की, “ आगामी निवडणुकीत आघाडी होऊ शकते किंवा न होऊ शकते. याबाबत बसून चर्चा करून निर्णय घेऊ. दोन भाऊ एकत्र आले तर आम्हाला काही अडचण नाही. मात्र, सध्या तरी राज ठाकरे आमच्या आघाडीत नाहीत. ”
मोदी-शाहांवर आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधताना चैनिथला म्हणाले, “ जो पर्यंत मोदी-शाह आहेत, तोवर देशात भीतीमुक्त, स्वच्छ आणि मोकळ्या निवडणुका होणार नाहीत. मतदार याद्यांमध्ये घोळ करून महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये सत्ता भाजपने घेतली. निवडणूक आयोग भाजपच्या हातात आहे, ते जे सांगतील तेच होईल.” त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण, परराष्ट्र धोरणातील अपयश, डोनाल्ड ट्रम्प कडून होणारा टॅरिफ वाद या विषयांवरूनही केंद्र सरकारवर टीका केली.
राज्य सरकारवर हल्लाबोल करताना चैनिथला म्हणाले, “ हे सरकार भ्रष्टाचारी आहे. मुख्यमंत्री शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो असं सांगतात, पण अजून ती पूर्ण झालेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुद्दाम पुढे ढकलल्या जात आहेत. आम्ही लवकरात लवकर निवडणुकीच्या घोषणा व्हाव्यात, अशी मागणी करत आहोत.”
चैनिथला यांनी कार्यकर्त्यांना घराघरात जाऊन जनजागृती करण्याचे आवाहन केले आणि काँग्रेसच्या जनसंवाद मोहिमेला गती देण्याचे निर्देश दिले. त्यांनी स्पष्ट केले की, हा लढा केवळ निवडणुकीचा नसून लोकशाही वाचवण्याचा आहे, आणि त्यासाठी काँग्रेस शेवटपर्यंत लढेल.