ग्रेगरी पेक : स्टार ऑफ मिलेनियम

0
217

गन्स ऑफ नॅव्हेराॅन, रोमन हॉलीडे, बिग कंट्री, मॅकेनाज गोल्ड, टू किल अ माॅकींग बर्ड, स्पेलबाउंड, द गनफायटर हे चित्रपट व त्यातील त्याने अभिनीत केलेल्या असंख्य व्यक्तीरेखा आजही आवडीने पाहिल्या जातात तो ग्रेगरी पेक. हॉलीवूड चा हॅन्डसम, सभ्य – सुसंस्कृत व्यक्तीमत्वाचा , डेमोक्रॅट, स्त्री स्वातंत्र्याचा आदर करणारा, चारित्र्यवान ग्रेगरी पेक.

‘टू किल अ माॅकींगबर्ड’ साठी ग्रेगरी पेक ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे ऑस्कर मिळाले. या सिनेमातील त्याची आई नसलेल्या दोन मुलांना वाढवणारी, जीवनातील मूल्यं व नितीमत्ता या विषयी ठाम मते असलेली व गोर्या वंशवादाची शिकार असलेल्या ब्लॅक व्यक्तीला न्याय मिळवून देण्याची धडपड करणा-या वकीलाची भूमिका जगभर गाजली. ही त्याची सर्वोत्कृष्ट भूमिका होती. त्याचे स्वतःचे व्यक्तीमत्व ही या भूमिकेच्या जवळ जाणारे असल्याने अभिनयातही ते सहज उमटले होते. हा चित्रपट निराळा होता. ब्लॅक’- व्हाईट वंशवादाचा विषय यात हाताळला होता. व्हाईट स्त्रीवर बलात्कार केल्याचा खोटा आरोप ब्लॅक व्यक्तीवर केला जातो व ब्लॅक व्यक्तीचा वकील असलेल्या ग्रेगरी पेक ला सत्य परिस्थिती, सामाजिक असमानता, वंशभेद यांचे दाहक दर्शन होते. ग्रेगरी पेक चा ‘स्क्रीन प्रेझेन्स’ असामान्य होता. पडद्यावर तो असताना त्याच्यावरची नजर हटवणे मुश्कील आहे. टू किल अ माॅकींगबर्ड मधिल ग्रेगरी ची भूमिका व ती व्यक्तीरेखा अमेरिकन फिल्म इन्स्टिटय़ूटने गेल्या 100 वर्षातील ‘ग्रेटेस्ट फिल्म हिरो’ म्हणून गौरवली आहे यातच सगळे आले. (इंडीयाना जोन्स दुस-या क्रमांकावर व जेम्स बाँड तिस-या यातून ली हार्पर लिखित वकिलाचे कॅरेक्टर व ग्रेगरी पेकच्या अभिनयातील ताकद कळून येते)

गन्स ऑफ नॅव्हेराॅन मधिल त्याने रंगवलेला ‘कॅप्टन मॅलरी’ अगदी ही कादंबरी लिहिलेल्या ॲलिस्टर मॅक्लिनला ही त्यालाच डोळ्यासमोर ठेवून लिहिली आहे असे वाटले असेल. ‘मॅकेनाज गोल्ड’ मधली ॲरिझोना व उटाह मधील भव्य द-याखो-यात अपाची टोळ्यासमवेत सोन्याच्या शोधातली व्यक्तीरेखाही अफाट गाजली. बंदूक संस्कृती त्याला मान्य नव्हती. त्या विरूद्ध त्याने वेळोवेळी आपली मते व्यक्त केली होती. गर्भपात, संतती नियमनाच्या साधनांचा वापर या स्त्री आरोग्यविषयक बाबीवर त्याची मते आग्रही होती. स्त्री स्वातंत्र्याचा आदर करणारा हा एक निराळाच हॉलीवूड व इंग्रजी चित्रपटांचा सुपरस्टार होता. जगभर त्याचे फॅन्स होते. भारतीय हिंदी चित्रपट सृष्टी ही त्याला अपवाद नव्हती.

हिंदी चित्रपटांची अनभिषिक्त सम्राज्ञी , प्रचंड लोकप्रिय अभिनेत्री सुरैय्या होती. लाहोरमधे जन्मलेली ही सुंदर हिराॅईन स्वतंत्र व्यक्तिमत्वाची होती. स्वतंत्र व्यक्तीमत्वाची म्हणायचे कारण त्यावेळेचा टाॅपचा स्टार दिलिप कुमार बरोबर तिने कधीही काम केले नाही. के असिफ या दोघांना घेऊन एक चित्रपट काढत होते व त्याचे चित्रीकरणही सुरू झाले होते. परंतू दिलिप कुमारसह काम तिला पसंत पडले नाही व तिने नंतर दिलिप कुमार सह एकही चित्रपट केला नाही. तर अशी ही वेगळी हिराॅईन त्यावेळेस हिंदी सिनेमात यश व प्रसिद्धीच्या शिखरावर होती व तिचा सर्वात मनपसंत अभिनेता होता ग्रेगरी पेक. देव आनंदच्या आकंठ प्रेमात बुडालेली ही सुंदरी हाॅलीवूडच्या टाॅपस्टारच्या भेटीच्या प्रतिक्षेत होती. हा योगही जुळून आला. ग्रेगरी पेक ‘पर्पल प्लेन ‘ च्या शूटींग साठी श्रीलंकेत जाताना मुंबईत आला व रात्री सुरैय्याच्या घरी ही बहुचर्चित भेट झाली. सुरैय्याने स्वतःच्या सहीनिशी दिलेला आपला फोटो ग्रेगरी पेकने आपल्या व्हिलाच्या भिंतीवर लावला होता. देव आनंद ही ग्रेगरी पेक ला परदेशात भेटला होता. दोघांच्या चेहरेपट्टीत साम्य होते. पण अभिनय निराळा होता. इंग्रजी सिनेमाला जगभर प्रेक्षक होता. हिंदी ला मर्यादा होत्या. देव आनंद व सुरैय्याला त्यांचे प्रेम लाभले नाही.त्यांचे प्रेम लग्नात रूपांतरित झाले नाही. देव आनंद ने नंतर लग्न केले पण सुरैय्या आजन्म अविवाहित राहिली. ती कदाचित देव मधे ग्रेगरी पेक ला पहात असावी.

ग्रेगरी पेक 5 वर्षाचा असताना त्याचे आई वडील स्वतंत्र झाले. त्यांचा घटस्फोट झाला. त्याचा संभाळ आजी ने केला. आईवडीलाविना त्याचे बालपण असुरक्षित गेले. त्याची पहिली भूमिकाच रशियन गोरीला फायटरची होती. साल होते 1944 व सिनेमा होता ‘डेज ऑफ ग्लोरी ‘. हाॅलीवूड मधे टाॅपचा स्टार असुनही ग्रेगरी पेक सामाजिक कारणासाठी रस्यावर उतरण्यास बिचकला नाही. तथाकथित प्रतिष्ठेच्या जाळ्यात न अडकता आपल्या आतील आवाजाशी प्रामाणिक राहिला. अमेरिकेतील नियंत्रणाबाहेर गेलेल्या बंदुक संस्कृती विरूद्ध मार्टीन ल्युथर किंगसह तो आंदोलनात उतरला. ग्रेगरी पेक ची अबाधित लोकप्रियता त्याच्या देखण्या व्यक्तीमत्वासह त्याची मते, तत्वे, प्रामाणिकपणा व नैतिकता या सर्वकष व्यक्तीमत्वातआहे. वयाच्या 87 व्या वर्षी 2003 मधे ग्रेगरी पेकचे झोपेतच ब्राॅन्कोन्युमोनियाने निधन झाले.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here