ऐतिहासिक तलवार महाराष्ट्रात परतणार

0
103
Google search engine
लंडन : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा साम्राज्याचे सेनानी राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार आता दीर्घ परदेशवासानंतर महाराष्ट्रात परत येत आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे लंडनमध्ये आयोजित कार्यक्रमात या तलवारीचे औपचारिक हस्तांतरण करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वाघनख्यानंतर मराठा साम्राज्यातील आणखी एक अमूल्य आणि अभिमानास्पद ठेवा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशात सामील होणार आहे. राज्य सरकारने ही तलवार एका मध्यस्थामार्फत सुमारे ४७.१५ लाख रुपयांना खरेदी केली असून १६ ऑगस्ट पर्यंत ती मुंबईत दाखल होणार आहे.
ऐतिहासिक महत्त्व
रघुजी भोसले हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक पराक्रमी व रणनीतीत निपुण सरदार होते. त्यांच्या युद्धनीती आणि शौर्यावर प्रसन्न होऊन शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ ही उपाधी बहाल केली होती. १७४५ च्या दशकात त्यांनी बंगालच्या नवाबांविरुद्धच्या युद्धमोहिमा यशस्वीरीत्या पार पाडत मराठा साम्राज्याचा बंगाल व ओडिशापर्यंत विस्तार केला. दक्षिण भारतातही त्यांनी लष्करी व राजकीय दबदबा निर्माण केला होता.
तलवारीची वैशिष्ट्ये
ही तलवार मराठा शैलीतील फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना मानली जाते. एकधारी पाते, सोन्याचे नक्षीकाम आणि युरोपिय बनावटीचे पाते हे तिचे वैशिष्ट्य असून, अशा प्रकारचे पाते १७००-१८००00-1800 च्या काळात प्रसिद्ध होते. पात्याच्या पाठीवर तळाशी ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा’ असे सोन्याच्या पाण्याने कोरलेले आहे.
इतिहास अभ्यासकांच्या मते, 1718 मध्ये नागपुरात ईस्ट इंडिया कंपनीने भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली तेव्हा ही तलवार इंग्लंडला नेली गेली असावी. आता जवळपास तीन शतकांनंतर ती आपल्या भूमीत परत येत आहे, हा महाराष्ट्राच्या इतिहासासाठी एक अभिमानाचा क्षण मानला जात आहे.
ॲड. आशिष शेलार यांचे ट्विट-
मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष असलेली तलवार आपल्या ताब्यात ! शूर मराठा सरदार श्रीमंत रघुजीराजे भोसले यांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या तलवारीचा लंडनमध्ये होत असलेला लिलाव महाराष्ट्र सरकारने जिंकला होता. आणि आज ही तलवार आपण आपल्या ताब्यात घेतली आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचा लिलाव जिंकून आपण आपला ऐतिहासिक वारसा परत महाराष्ट्रात आणण्यास यशस्वी झालो आहोत. या ऐतिहासिक तलवारीचा लिलाव जिंकण्यापासून ते ती ताब्यात घेण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे मार्गदर्शन आणि भूमिका असलेल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, भारताचे परराष्ट्र मंत्रालय, लंडन येथील भारतीय दूतावासाचे अधिकारी, मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जी आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सर्व अधिकारी यांचे मनःपूर्वक आभार !
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here