कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
सकाळी ९ वाजता शाळा सुरू करण्याच्या सरकारी निर्णयाची अंमलबजावणी का होत नाही, याचा आढावा येत्या दोन-तीन दिवसांत घेतला जाईल. काही शाळा दोन सत्रांमध्ये भरतात किंवा इतर काही अडचणी असतील, तर त्यावर तोडगा काढून विद्यार्थी आणि पालकांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. अशी माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली.
लहान मुलांची झोप पूर्ण व्हावी आणि त्यांचे आरोग्य निरोगी राहावे, यासाठी राज्य सरकारने इयत्ता चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ वाजता किंवा त्यानंतर सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, याची अमलबजावणी झाली कि नाही याकडे शिक्षण विभागाने पहिले नाही. राज्यातील किती शाळा सकाळी ९ वाजता सुरू होतात आणि किती शाळा सकाळी ७ वाजता सुरु होतात, याची कोणतीही ठोस माहिती शिक्षण विभागाकडे नाही. त्यामुळे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना स्वतःच्या खात्याशी संबंधित शाळांच्या वेळांची माहिती कधी मिळणार?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
फेब्रुवारी २०२४ मध्ये शालेय शिक्षण विभागाने नर्सरी ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. तरीही २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून मुंबई (महानगर क्षेत्र), पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, अमरावती, सोलापूर यासारख्या शहरांमधील अनेक शाळा सकाळी ७ वाजताच सुरू होत आहेत. या सरकारी निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत विचारणा केली असता, शिक्षण अधिकाऱ्यांनी हा निर्णय प्रभावीपणे राबवणे शक्य नसल्याचे सांगितले.
शाळांच्या वेळांबाबतही शिक्षण अधिकाऱ्याना माहिती नाही. माहित नाही स्पष्ट उत्तर शिक्षण अधिकारी देतात, तर प्राथमिक शिक्षण संचालनालयातील वरिष्ठ अधिकारी ‘माहिती गोळा करावी लागेल’ असे सांगतात.



