कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
गेल्या ४२ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचला अखेर मूर्त रूप मिळाले असून, त्याचा भव्य उद्घाटन सोहळा रविवारी (दि. १७) रोजी पार पडणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कार्यक्रम पत्रिका निश्चित केली असून, जिल्हा बार असोसिएशनने जिल्हा न्याय संकुलात आयोजित पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.
रविवारी दुपारी साडेतीन वाजता सीपीआर समोरील इमारतीत फीत कापून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन होईल. त्यानंतर मेरी वेदर ग्राऊंडवर मुख्य समारंभ होणार असून, मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती मकरंद कर्णिक अध्यक्षस्थानी असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे, तसेच पालकमंत्री प्रकाश आबिटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सहा जिल्ह्यांतील मंत्री, आमदार, खासदार, बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य, सेवानिवृत्त न्यायाधीश, विधि महाविद्यालयांचे विद्यार्थी, खंडपीठ कृती समिती, विविध संस्था, संघटना, तालीम संस्था आणि पक्षकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. उपस्थितांसाठी पाच हजार खुर्च्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
सर्किट बेंचच्या कामकाजाला सोमवारी (दि. १८) सकाळी अकरापासून सुरुवात होईल. उद्घाटन प्रसंगी सरन्यायाधीश गवई, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे व पवार यांचा राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा, शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
मुंबई उच्च न्यायालय, राज्याचा विधि व न्याय विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला असून, तो संस्मरणीय ठरणार असल्याचा विश्वास बार असोसिएशनने व्यक्त केला आहे.
—————————————————————————————-