पन्हाळा : प्रतिनिधी
श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर वर्षभर अनेक राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. डोंगरावर येणारे भाविक आणि दुकानदार सर्रास प्लास्टिकचा वापर करतात. प्लास्टिकचा वापर कायमस्वरूपी बंद करण्यासाठी प्रशासनाने भरारी आणि जप्ती पथक स्थापन केल आहे. या जप्ती पथक फलकाचे अनावरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
जोतिबा डोंगरावर जोतिबाच्या चैत्र आणि श्रावण षष्टी यात्रा मोठ्या असतात. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातून लाखो भाविक डोंगरावर येतात. त्यांचबरोबर वर्षभर ही हजारो भाविक डोंगरावर जोतिबा देवाच्या दर्शनाला येतात. डोंगरावर येणारे भाविक आणि दुकानदार सर्रास प्लास्टिकचा वापर करतात. गुलाल, प्रसाद, खाद्य पदार्थ, लस्सी तसेच यात्रेवेळी भविकांसाठी विविध संघटनाच्या वतीने महाप्रसाद, चहा, पाणी, नाष्ठाची सोय करण्यात येते. विविध प्रकारचे खाद्य पदार्थाचे स्टॉलं उभारण्यात येतात. यावेळी सर्वजण सर्रास प्लास्टिकचा वापर करतात. त्यामुळं डोंगरावर मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो. या कचऱ्यामुळे डोंगरावरील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून डोंगरावर प्लास्टिकचा वापर कायमस्वरूपी बंद करण्यासाठी प्रशासनाने भरारी आणि जप्ती पथक स्थापन केल आहे. या जप्ती पथक फलकाचे अनावरण मान्यवरांचे हस्ते नुकतच करण्यात आले.
यावेळी बोलताना पन्हाळा पंचायत समितिच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर म्हणाल्या, जोतिबा डोंगर प्लास्टिक मुक्त करणे हिच खरी जोतिबाची भक्ती असून जोतिबा डोंगर प्लास्टिक बंदीसाठी उचललेले हे पहिले पाऊल आहे. यासाठी भाविक, व्यापारी आणि दुकानदारांनी सहकार्य करण्याचे आवाहनही माडकर यांनी केलं आहे.
या भरारी आणि जप्ती पथकामध्ये ग्रामस्थ, पुजारी, व्यापारी, दुकानदार,पोलीस, महसूल, ग्रामपंचायत, सामाजिक तसेच राजकीय कार्यकर्ते यांचा समावेश करण्यात आला आहे.






