राज्यात ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ राज्यगीत सक्तीचं

विद्यार्थ्यांना हेल्थ कार्ड देणार : शिक्षणमंत्री दादा भुसे

0
204
Google search engine
भंडारा : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्याच्या शालेय शिक्षण प्रणालीत काही महत्त्वपूर्ण बदल होत असून, त्यासंबंधीचे निर्देश राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. भंडारा येथे आयोजित शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठकीत त्यांनी विविध निर्णयांची घोषणा केली.
‘ गर्जा महाराष्ट्र माझा ‘ राज्यगीत आता सर्व शाळांमध्ये सक्तीचं
राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर राज्यगीत ‘ गर्जा महाराष्ट्र माझा ‘ गाणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यापूर्वी फक्त मराठी शाळांमध्ये राज्यगीत गाण्याचा नियम होता. परंतु, आता इंग्रजी, उर्दू, हिंदी, CBSE, ICSE, तसेच अन्य सर्व शाळांनाही हा नियम लागू राहणार आहे.
मराठी शाळांप्रमाणेच सर्वच शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर राज्यगीत ‘ गर्जा महाराष्ट्र माझा ‘ मानवंदनेने गायलं गेलं पाहिजे. जे शाळा या आदेशाची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशारा दादा भुसे यांनी दिला.
शिष्यवृत्तीधारकांची संख्या वाढवण्याचा संकल्प
दादा भुसे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भातही महत्त्वाची घोषणा केली. यापूर्वी फक्त इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जायच्या. काही काळ या परीक्षांचा स्तर बदलून पाचवी आणि आठवी केला गेला. आता मात्र, सरकारने निर्णय घेतला आहे की, इयत्ता चौथी, पाचवी, सातवी आणि आठवी या सर्वच वर्गांच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाईल.

“शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढवून गुणवत्तावान विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून देणार आहोत,” असं भुसे यांनी स्पष्ट केलं.

विद्यार्थ्यांना ‘हेल्थ कार्ड’ 
शाळांमध्ये फक्त शिक्षण नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडेही लक्ष देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पालकांच्या उपस्थितीत आरोग्य पथकामार्फत करण्यात येणार असून, तपासणीनंतर प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक हेल्थ कार्ड दिलं जाईल.

“हे हेल्थ कार्ड त्यांच्या भविष्यातील शैक्षणिक, शासकीय आणि आरोग्यविषयक प्रक्रियांमध्ये उपयुक्त ठरणार आहे,” अशी माहिती दादा भुसे यांनी दिली.

या सर्व निर्णयांमुळे शालेय शिक्षण अधिक प्रभावी, शिस्तबद्ध आणि विद्यार्थी-केंद्रित होण्याची अपेक्षा आहे. शिक्षण विभागाकडून यासाठी लवकरच कार्यपद्धतीसंबंधीचे परिपत्रक जारी करण्यात येणार आहे.
———————————————————————————–
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here