नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
अमेरिकेने काल ( ६ ऑगस्ट ) रात्री भारतावर ५० टक्के आयात टॅरिफ लावण्याची अधिकृत घोषणा केली. गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतावर टॅरिफ लावण्याबाबत सातत्याने धमकीवजा वक्तव्य करत होते. भारताकडून अद्याप सार्वजनिकरित्या कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली जात नव्हती. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रथमच या मुद्यावर परखड आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे.
ट्रेड डील का फिस्कटली ?
भारत आणि अमेरिकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून व्यापारी करार (ट्रेड डील) संदर्भात सखोल चर्चा सुरू होती. मात्र अमेरिकेने भारताच्या डेअरी आणि कृषी क्षेत्रांमध्ये प्रवेश देण्याची मागणी ठामपणे केली होती. भारताने ही मागणी स्पष्ट शब्दांत फेटाळली. भारताने स्पष्ट केले की, “काहीही झालं तरी कृषी आणि डेअरी क्षेत्र खुलं करणार नाही.” त्यानंतर चर्चेतून कोणताही तोडगा निघू शकला नाही आणि ट्रेड डील थांबली.
मी किंमत मोजायला तयार आहे
एम.एस. स्वामीनाथन यांच्या जन्म शताब्दी महोत्सव कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या टॅरिफ निर्णयावर थेट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “आमच्यासाठी आमच्या शेतकऱ्यांचं हित सर्वोच्च आहे. भारत आपले शेतकरी, मच्छीमार आणि डेअरी शेतकरी यांच्या हिताशी कुठलीही तडजोड करणार नाही. मला माहितीय, यासाठी मला वैयक्तिक पातळीवर मोठी किंमत चुकवावी लागेल. पण मी यासाठी तयार आहे.”
शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध
मोदी पुढे म्हणाले, “ माझ्या देशातील मच्छीमारांसाठी, पशुपालकांसाठी भारत तयार आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं, शेती खर्च कमी करणं, आणि उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करणं हे आमचं ध्येय आहे. आमचं सरकार शेतकऱ्यांची ताकद देशाच्या प्रगतीचा आधार मानतं.”
राजकीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचं लक्ष केंद्रित
या घडामोडीनंतर भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र भारताच्या भूमिकेवर अनेक तज्ज्ञांनी आणि राजकीय विश्लेषकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. देशांतर्गत पातळीवर पंतप्रधान मोदींच्या या भूमिकेला व्यापक पाठिंबा मिळत आहे.
ही घटना केवळ व्यापारिक नाही, तर भारताच्या स्वावलंबी धोरणांची आणि शेतकरी हिताच्या राजकीय भूमिकेचीही कसोटी ठरत आहे. आता अमेरिका पुढे काय निर्णय घेते आणि भारत त्याला कसा प्रतिसाद देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
———————————————————————————————–