कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
काल लख्ख उघडलेले वातावरण असतानाच आज सकाळी सकाळी तीन तास पावसाने हजेरी लावली. यामुळे पुन्हा असाच पाऊस सुरु होणार अशी भीती वाटत असतानाच अकरा नंतर परत आकाश निरभ्र झाले. हवामान विभागाने राज्यातील हवामानात मोठे बदल होत असून, पुढील २४ तासांमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, धाराशीव, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, भंडारा, आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरीही कोसळू शकतात.
यावर्षी मान्सून वारे अपेक्षेपेक्षा लवकर आले यामुळे पावसाळा लवकर सुरु झाला. पावसाने सलग सव्वादोन महिने महाराष्ट्रात हजेरी लावली. आता मान्सूनच्या वाऱ्याचा वेग कमी झाल्या कारणानं राज्यात पावसाचं प्रमाण कमी झालं. मात्र आता मध्यपूर्व अरबी समुद्रापासून पूर्व- पश्चिमेकडे हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, त्यामुळं राज्याच्या काही भागांवर पावसाळी ढग दाटलेले दिसत आहेत.
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकणातीव दक्षिणेकडे असणाऱ्या जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल. दरम्यान वाऱ्याचा वेग वाढून ताशी ३० ते ४० किमी इतका असेल. तर, दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून ते अगदी मराठवाडा आणि गोव्यापर्यंतसुद्धा वादळी पाऊस पडेल, असे हवामान विभागानं सांगितले आहे.
———————————————————————————————-