कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
वरळी येथील एनएससीआय डोम (एसव्हीपी स्टेडियम) येथे ६०व्या व ६१व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात गजलगायक भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५, काजोल देवगण यांना स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०२४, अनुपम खेर यांना स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२४, अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार २०२४ आणि निर्माते महेश मांजरेकर यांना चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२४ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावर्षीपासून प्रथमच सुरू करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार- २०२५ युनेस्कोतील भारताचे प्रतिनिधी विशाल शर्मा यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे जतन व संवर्धन करणाऱ्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, कार्यकारी अध्यक्ष ऋषिकेश यादव, दुर्ग अभ्यासक माधव फडके यांना सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि पालकमंत्री मंगलप्रभात लोढा प्रमुख उपस्थित होते.
चित्रीकरणासाठी नि:शुल्क परवानगी : यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मराठी चित्रपटासाठी एक घोषणा केली. मुंबईतील कोणत्याही ठिकाणावर चित्रीकरणासाठी आता नि:शुल्क परवानगी दिली जाणार आहे. तसेच राज्यातील विविध चित्रपट निर्मिती स्थळांवर सुलभ दरात सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.