कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
देशात येत्या काही वर्षात सेमीकंडक्टर (अर्धसंवाहक) क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सरकार आणि खासगी उद्योगांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे क्षेत्र देशाच्या आर्थिक आणि तंत्रज्ञानविषयक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
भारतातील सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी पावलं उचलली असून, यातून देशाला जागतिक स्तरावर दक्षिण कोरिया, तैवान, अमेरिका यांसारख्या प्रगत देशांशी स्पर्धा करता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी केंद्र सरकारने उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन योजना आणि विशेष आर्थिक धोरणांची आखणी केली आहे. भारत २०३० पर्यंत या क्षेत्रात अर्थात जागतिक स्तरावर होणाऱ्या चिप बाजारपेठेत ८.३ लाख कोटी ते ९.१३ लाख कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करण्याचा मानस आहे. यामुळे देशात नवीन सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन युनिट्स, रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटर्स सुरू होण्याची शक्यता आहे. परिणामी, इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, चिप डिझाइन, मॅन्युफॅक्चरिंग आदी क्षेत्रांतील कुशल आणि अर्ध-कुशल कामगारांसाठी हजारो नोकऱ्या निर्माण होतील.
विशेष म्हणजे, भारत सरकार ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमांतर्गत देशात सेमीकंडक्टर उत्पादनासाठी स्वयंपूर्णता साधण्याचा प्रयत्न करत आहे. गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये या क्षेत्रासाठी विशेष औद्योगिक वसाहती विकसित केल्या जात आहेत.
तज्ज्ञांच्या मते, आगामी काही वर्षांत भारत सेमीकंडक्टर उत्पादनात एक आघाडीचा खेळाडू म्हणून उदयास येऊ शकतो, आणि यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा हातभार लागणार आहे.



