कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
चार दिवसापासून उघडलेला पाऊस पुन्हा सुरु होणार आहे. हवामान विभागाने ठिक ठिकाणी अचानक पाऊस कोसळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यात आज गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे. घाटमाथ्याच्या पट्ट्यात विशेषतः विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सांगली आणि सोलापूरसाठी विशेषतः यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पावसाचा अंदाज घेऊन महसूल विभागाने शेतीसंबंधित कामे आखण्याचा आणि उरकण्याचा सल्ला दिला आहे. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे आवाहन कृषी विभागाकडूनही करण्यात आले आहे.
राज्यात आज पुन्हा एकदा पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर १२ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, आणि पालघरसह कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही आज हलक्याशा ते मध्यम पावसाची शक्यता आहे. यासोबतच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सावध राहावे. कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.. सांगली आणि सोलापूरसाठी विशेषतः यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ केएस होसाळीकर यांनी राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात पावसाची हजेरी असेल हे स्पष्ट केलं. पुढील २४ तासांमध्ये राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यानुसार लातूर, सोलापूर, जालना, परभणी, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली इथं पावसाची दमदार हजेरी असेल असं सांगण्यात आलं आहे.