नाशिक : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यात सत्तेवर असलेली महायुती सरकार सध्या अंतर्गत कुरबुरींनी ग्रासलेली आहे. वेगवेगळ्या खात्यांवरील हस्तक्षेप, निधी वाटपातील विसंगती यावरून अनेक मंत्र्यांनी आपली नाराजी वेळोवेळी व्यक्त केली आहे. आता पर्यावरण, हवामान बदल आणि पशुसंवर्धन खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनीही आपल्या खदखदीला वाचा फोडली असून, “माझ्या खात्याकडे बजेट नाही,” असे जाहीरपणे सांगितले आहे.
नाशिक दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “ सध्या मी पर्यावरणमंत्री आहे. प्रदूषण करणारे उद्योग उभे राहत आहेत. आपण कचऱ्याची सामूहिक जबाबदारी घेतली पाहिजे. वातावरणीय बदलांचंही खाते माझ्याकडेच आहे. सध्या वातावरण बेभरोसे झालंय. राज्यात साखर कारखान्यांची संख्या वाढतेय, टायर जाळून ऑइल तयार करणाऱ्या कंपन्या आहेत, खाणी आणि वाळूविक्री बाबतही आम्हाला लक्ष ठेवावं लागणार आहे.”
खात्याच्या निधीबाबत बोलताना पंकजा म्हणाल्या, “ माझ्या खात्याकडे बजेटच नाही. आम्ही सीईटीपी प्लांट उभारण्याच्या प्रयत्नात आहोत, पण शासनाने आम्हाला थोडी तरी मदत करावी. माझं काम सध्या पोलिसासारखं. फक्त शिट्टी वाजवण्यासारखं झालंय. आमच्या खात्याला जेव्हा उद्योग विभागांना फाईन बसतो, तेव्हाच काहीसं बजेट मिळतं. ही स्थिती बदलली पाहिजे.”
नियमांचं काटेकोर पालन गरजेचं
मुंडे यांनी स्पष्ट केलं की, पर्यावरण मंत्रालय हे केवळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) पुरतं मर्यादित नाही. “आमची उद्योगांच्या विरोधात भूमिका नाही, पण नियम आणि कायद्याचं पालन झालंच पाहिजे. आम्ही उद्योगांना बळ देत पर्यावरणाचं रक्षण करू इच्छितो. आज काही नद्यांचं पाणी गटारासारखं झालंय. नमामी गंगे योजनेचा आढावा घेतला, पण त्यात फारशी प्रगती दिसली नाही,” असं त्यांनी ठासून सांगितलं.
कुंभमेळ्यासाठी शुद्धतेवर भर
आगामी नाशिक कुंभमेळ्याबाबतही त्यांनी भाष्य केलं. “कुंभमेळ्याच्या आयोजनात जिल्ह्याचे पालकमंत्री, कुंभ मंत्री आणि मुख्यमंत्री लक्ष घालतीलच, पण पाण्यात डुबकी मारताना ती डुबकी शुद्ध असावी यासाठी आम्ही विशेष लक्ष देणार आहोत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राजकीय वर्तुळात पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे. एकीकडे सत्तेत सहभागी असूनही खाते अपुऱ्या निधीअभावी कुचकामी ठरत असल्याचं त्यांनी जाहीरपणे मान्य केलं आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या अंतर्गत समन्वयावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
———————————————————————————–






