कोल्हापूर : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भारताच्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात तब्बल सोळा महिन्यांनंतर मोठी उसळी पहायला मिळाली आहे. एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (PMI) जुलै महिन्यात ५९.१ वर पोहोचला असून, हा गेल्या दीड वर्षातील सर्वात उच्चांक आहे. जूनमध्ये हा आकडा ५८.४ होता. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळण्याच्या दिशेने ही सकारात्मक वाटचाल मानली जात आहे.
नवीन ऑर्डर आणि उत्पादनामुळे वाढ
एचएसबीसीचे मुख्य भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रांजुल भंडारी यांनी सांगितले की, “ जुलैमध्ये उत्पादन क्षेत्राची वाढ ५९.१ टक्क्यांवर पोहोचली, जी नवीन ऑर्डर्स आणि वाढलेल्या उत्पादनामुळे शक्य झाली आहे.”
विक्री आणि उत्पादनात विक्रमी वाढ
-
सर्वेक्षणानुसार, एकूण विक्री पाच वर्षांतील सर्वाधिक गतीने वाढली आहे.
-
यामुळे उत्पादन वाढही १५ महिन्यांतील सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे.
-
पुढील १२ महिन्यांतही उत्पादन वाढेल असा विश्वास उत्पादक कंपन्यांनी व्यक्त केला आहे.
-
मात्र, एकूण सकारात्मक भावना ही गेल्या तीन वर्षांतील सर्वात कमी पातळीवर आहे. ही एक चिंतेची बाब आहे.
कच्चा माल आणि विक्री किमती वाढल्या
-
अॅल्युमिनियम, चामडे, रबर, स्टील यांसारख्या कच्च्या मालाच्या किमती झपाट्याने वाढल्या.
-
त्यामुळे उत्पादन खर्च वाढून कंपन्यांनी आपले विक्री दरही वाढवले आहेत.
-
या किंमतींचा दबाव ग्राहकांवर येण्याची शक्यता आहे.
४०० कंपन्यांवर आधारित सर्व्हे
एस अँड पी ग्लोबलद्वारे घेतलेल्या या पीएमआयचा आधार देशातील चारशे उत्पादन कंपन्यांच्या प्रतिसादांवर आहे. हा आकडा ५० च्या वर असल्यास उत्पादन क्षेत्रात विस्तार दर्शवतो, आणि ५० च्या खाली असला तर संकुचन सूचित करतो.
जुलै २०२५ मध्ये भारतीय उत्पादन क्षेत्राने तब्बल सोळा महिन्यांतील सर्वोच्च उसळी घेतली आहे. विक्री, ऑर्डर आणि उत्पादन या तिन्ही आघाड्यांवर उत्साहजनक आकडे समोर आले आहेत. कच्चा माल महाग झाल्यामुळे उत्पादन खर्च वाढला असला तरी, एकूण वातावरण सकारात्मक आहे. पुढील काही महिन्यांतही ही तेजी टिकून राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
————————————————————————————