कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शुक्रवारी कोल्हापुरात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत वनताराच्या सीईओंनी स्पष्ट केलं की, “ हत्तीण हस्तांतरणामध्ये वनताराची कोणतीही भूमिका नव्हती. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच कारवाई केली. यापुढे जर न्यायालयाकडून कोणतेही स्पष्ट आदेश मिळाले, तर त्यानुसार माधुरी हत्तीण परत करण्यात येईल. नांदणी मठाने कायदेशीर बाबी पूर्ण केल्या तर आम्ही संपूर्ण सहकार्य करू.”असे स्पष्ट मत व्यक्त केले असून वनताराचे युनिट नांदणीतच सुरू करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सूचित केलं.
नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वनतारा रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये हलवण्यात आल्यानंतर कोल्हापूर करांमध्ये असंतोषाची भावना उमटली. याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस वनताराचे सीईओ, नांदणी मठाचे मठाधीपती, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने व धनंजय महाडिक हे उपस्थित होते.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर – कोल्हापूरवासीयांची भावना सर्वोच्च न्यायालयात मांडू. परंतु, केवळ जनभावना नव्हे, तर कायदेशीर प्रक्रिया ही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण कायदेशीर मार्गाने लढा देऊ. वनतारा आपल्याला सहकार्य करणार आहे.” त्यांनी असंही नमूद केलं की, ” जैन धर्मीय नागरिकांच्या हत्तीणी विषयी असलेल्या भावनेचा कुणीही राजकीय वापर करू नये. यामध्ये राजकारण आणणं योग्य ठरणार नाही.”
या बैठकीतून स्पष्ट झालं की, शासन आणि वनतारा दोघेही माधुरी हत्तीण परत आणण्यासंदर्भात न्यायालयीन निर्णयाची वाट पाहत आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जनतेच्या भावना न्यायालयापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी घेतला आहे. या घडामोडींमुळे कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या मोहिमेला कायदेशीर आधार मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, पुढील टप्प्यात कोर्टात काय भूमिका मांडली जाते, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
———————————————————————————————-






