नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये दरवर्षी येणाऱ्या महापुराला कर्नाटकातील अलमट्टी धरण कारणीभूत ठरत असल्याचा निष्कर्ष जलतज्ज्ञांनी स्पष्ट केला आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय हा या दोन जिल्ह्यांसाठी अधिक धोकादायक ठरणार असून, याबाबत स्थानिक जनतेत तीव्र नाराजी असून राज्य शासनाने केंद्राकडे याविरोधात ठाम भूमिका घेतली आहे.
महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मागील महिन्यात मुंबईत बैठक घेऊन अलमट्टी उंची वाढीच्या प्रस्तावामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांवर चर्चा केली होती. या बैठकीत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय खासदार व आमदारांनी केंद्र सरकारपुढे एकमुखी भूमिका मांडावी, असा निर्णय घेण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे भेटीची वेळ मागण्यात आली होती. त्यानुसार दि. ४ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता नवी दिल्लीतील श्रमशक्ती भवन येथे महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. जलसंपदामंत्री विखे-पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना लेखी पत्र पाठवून या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
राज्य शासनाच्या अहवालानुसार, अलमट्टी धरणातून वेळेत विसर्ग न केल्याने कृष्णा नदीच्या पाण्याचा फुगवटा मागच्या बाजूस येतो आणि सांगली-कोल्हापूरसह अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होते. परिणामी, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाते, अनेक गावांचे स्थलांतर करावे लागते, तर दीड-दोन महिने संपूर्ण यंत्रणा ठप्प होते. कोट्यवधी रुपयांचे नुकसान दरवर्षी होत आहे.
स्थानिक पातळीवर नागरिक, शेतकरी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील अलमट्टी उंची वाढी विरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला असून, याला आता राजकीय पातळीवरही जोर मिळाला आहे. ४ ऑगस्टची बैठक या साऱ्या पार्श्वभूमीवर अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
—————————————————————————————-



