मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
फ्रान्स मधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जागतिक सिनेक्षेत्रातील एक अत्युच्च मानाचा सोहळा. या महोत्सवातील ‘मार्शे दु फिल्म’ (Marché du Film) या विभागात जगभरातील दर्जेदार आणि विचारप्रवर्तक चित्रपटांची निवड केली जाते. यंदा महाराष्ट्रातील विदर्भाच्या मातीतून साकारलेला एक अस्सल वऱ्हाडी भाषेतील चित्रपट या मंचावर झळकला ‘खालिद का शिवाजी’.
विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांच्या सहभागातून तयार झालेल्या या चित्रपटाने केवळ भाषिक वैविध्यच नव्हे तर संवेदनशील सामाजिक प्रश्न मांडूनही एक वेगळी छाप सोडली आहे.
कोण आहे ‘ खालिद ’ ?
चित्रपटाची संकल्पना आणि मूळ कथा उलगडताना दिग्दर्शक राज मोरे सांगतात, “ ही गोष्ट आहे पाचवीत शिकणाऱ्या खालिद नावाच्या मुस्लीम मुलाची. त्याला वर्गामध्ये सतत ‘ अफझलखान ‘ म्हणून चिडवलं जातं. ‘ शिवाजी म्हणजे अफझलखानाचा शत्रू, मग मी त्यांचा का असू ? ‘ असे विचार त्याच्या बालमनात घर करू लागतात. आणि इथूनच सुरू होतो खालिदचा वैचारिक प्रवास.”
खालिद या प्रश्नांची उत्तरं आपल्या कुटुंबात, आजी-आईकडे शोधतो. आणि हळू हळू त्याला समजायला लागतं की, शिवाजी महाराज हे केवळ युद्धनायक नव्हे, तर न्यायप्रिय, समतेचे विचार मांडणारे, प्रजाहित दृष्टीकोन ठेऊन राजकारण करणारे शासक होते.
‘ खालिद का शिवाजी ‘ हे नावच धाडसी !
आजच्या सामाजिक वातावरणात शिवाजी महाराजांचा उल्लेखही राजकीयदृष्ट्या परखड आणि भावनिक विषय ठरतो. अशावेळी एका मुस्लिम मुलाचं शिवाजी महाराजांशी वैचारिक नातं जोडणं हे धाडसाचं काम ठरतं. याबाबत दिग्दर्शक राज मोरे स्पष्टपणे म्हणतात, “ खालिद हे केवळ एक पात्र नाही, तर धर्माच्या आधारावर चिडवल्या गेलेल्या, प्रश्नांमध्ये अडकलेल्या अनेक मुलांचं प्रतिनिधित्व करतो. त्याचं नाव जसं मुस्लिम आहे, तसंच त्याचे प्रश्न सार्वत्रिक आहेत. या चित्रपटात आम्ही कोणावरही टीका केली नाही, फक्त खरा इतिहास शोधायचा प्रयत्न केला आहे.”
चित्रपटाचं लेखन आणि संवाद
या चित्रपटाची कथा कैलास वाघमारे यांनी लिहिलेली असून, संवादलेखन सुप्रसिद्ध नाटककार राजकुमार तांगडे यांनी केलं आहे. ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या प्रख्यात नाटकातून प्रसिद्ध झालेले तांगडे सांगतात, “ सध्या समाजात धार्मिक ध्रुवीकरण वाढत आहे. अशा काळात एका शाळकरी मुलाच्या नजरेतून शिवाजी महाराज समजून घेणं हा एक वेगळा आणि शांतता मूल्यांचा संदेश देणारा प्रयत्न आहे.”
कान मधील प्रतिसाद
‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाला कानच्या ‘मार्शे दु फिल्म’ विभागात जागा मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी यातील विषयवस्तू, सामाजिक भान आणि बालमनाचं चित्रण याला दाद दिली. “शिवाजी महाराजांचा इतिहास हा केवळ युद्धाचा इतिहास नाही, तर सामाजिक समतेचा इतिहास आहे. हे जाणून अनेक परदेशी प्रेक्षकही भारावले,” असं मोरे सांगतात.
चित्रपट केवळ शिवाजी महाराजांची गौरवगाथा नाही, तर त्यांच्या कर्तृत्वाच्या मुळाशी जाण्याचा आणि तेवढ्याच समतेच्या मूल्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. राज मोरे म्हणतात “आज इतिहासाच्या नावाखाली अपप्रचार, विकृती आणि भावनांवर आधारित राजकारण होतंय. पुस्तकं वाचली जात नाहीत, संशोधन होत नाही. अशा वेळी चित्रपटासारख्या माध्यमातून खरं सांगण्याची जबाबदारी आमच्यावर आहे.”
‘खालिद का शिवाजी’ हे फक्त एका मुलाचं आत्मशोध नाही. तो आहे अनेकांना पडणाऱ्या पण उत्तर न मिळालेल्या प्रश्नांचा शोध. एक अस्सल, संवेदनशील, आणि विचार करायला लावणारा अनुभव. शिवाजी महाराजांना धर्माच्या चौकटीबाहेर जाऊन पाहण्याचा, त्यांच्या विचारांचा पुन्हा नव्याने अर्थ लावण्याचा, आणि समतेच्या संदर्भात त्यांना समजून घेण्याचा हा नवा प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्याने महाराष्ट्रासाठीही ही अभिमानाची बाबच !
——————————————————————————————–



