मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्य सरकारच्या ‘ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने ’ तून लाभार्थी महिलांना मिळणारे मासिक १५०० रुपयांचे अनुदान हे दिले जात आहे. शासनाने हे पैसे प्रत्येक महिन्याच्या अखेरीस किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या आत देण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सध्या जुलैचा हप्ता अनेकांच्या खात्यात आलेला नसल्याने लाभार्थींमध्ये उत्सुकता आणि थोडी नाराजी आहे. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे मिळून एकूण ३,००० रुपये एकत्र लाभार्थींना दिले जाणार आहेत. राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर हे अनुदान मिळाल्यास, सरकारकडून महिलांना मिळणारी ही आगळीवेगळी राखी भेट ठरणार आहे.
याबाबत अजून अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली, तरी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रक्कम खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थी महिलांचा रक्षाबंधनचा सण अधिक आनंदात साजरा होणार आहे.
गैरव्यवहारांची मालिका
दरमहा मिळणाऱ्या या रकमेचा अनेक अपात्रांनी गैरफायदा घेतल्याचेही वास्तव उघड झाले आहे. विशेष म्हणजे पुरुषांनी ‘लाडकी बहीण’ बनून 10 महिने 1500 रुपयांचा लाभ घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे.
सुमारे 14 हजारांपेक्षा जास्त पुरुष लाभार्थ्यांनी मिळून तब्बल 21 कोटी रुपयांचा गैरवापर केल्याची माहिती उघड झाली होती. याद्वारे सरकारच्या योजनांमध्ये होत असलेला अपहार आणि व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांचीही हाव…
योजनेंतर्गत लाभ मिळावा यासाठी अपात्र महिलांनीही अर्ज केले होते. १ लाख ६० हजारांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांची चौकशी केल्यानंतर धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या. २ हजारांहून अधिक सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून, त्यांना सहाव्या-सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळत असूनही त्यांनी गोरगरिबांसाठी राखीव असलेल्या योजनेंतून पैसे घेतले.
कामाचे स्थैर्य, नियमित पगार असूनही केवळ हावेमुळे अशा कर्मचाऱ्यांनी योजनेवर डल्ला मारल्याचे निष्पन्न झाले. ही माहिती समोर आल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सरकारचा इशारा : वसुली आणि कारवाई
या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने घेत राज्य सरकारने दोषींवर कडक कारवाईचे आदेश जारी केले आहेत.
ज्या अपात्रांनी लाभ घेतला आहे, त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करण्यात येणार असून, संबंधित कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशीसह अन्य शिस्तभंगात्मक कारवायाही होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सरकारचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा असला तरी, अपात्रांनी केलेला गैरवापर आणि व्यावस्थेतील त्रुटी यामुळे खरी लाडकी बहीण न्यायापासून वंचित राहणार का, असा सवाल समाजात विचारला जातो आहे.राखीच्या सणात सरकारने दिलेली ३,००० रुपयांची भेट किती लाडक्या बहिणींपर्यंत वेळेत पोहोचते, आणि कोणाच्या खिशात अडकते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
——————————————————————————–