मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा १३ वा हप्ता लवकरच मिळणार आहे. महिला व बाल विकास विभागाने यासाठी २९८४ कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली असून, हा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसांत महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे.
ही योजना जुलै २०२४ मध्ये सुरु झाली असून, २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट खात्यावर दिले जातात. योजनेच्या एकूण खर्चासाठी सरकारने २८,२९० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकी, आता जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी २९८४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेत गैरप्रकार झाल्याच्या बातम्यांवर उत्तर देताना स्पष्ट केले की, काही पुरुषांनी चुकीने या योजनेचा लाभ घेतल्याचं निदर्शनास आलं आहे. याचप्रमाणे, २६.३४ लाख महिला अपात्र असूनही योजना सुरु झाल्यानंतर त्यांनी लाभ घेतल्याचंही माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या तपासणीतून समोर आलं आहे.
या अपात्र लाभार्थ्यांचा हप्ता जूनपासून स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे जून महिन्यात २ कोटी २५ लाख महिलांनाच हप्ता वितरित करण्यात आला होता. शासन दरमहा छाननी करून अपात्र लाभार्थ्यांची नोंदणी रद्द करत असून, यामुळे योजनेच्या एकूण खर्चातही महिना-महिन्याला घट होत आहे.
राज्य सरकारच्या या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक स्थैर्य, आत्मनिर्भरता व सन्मान मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि अजित पवार यांच्या पुढाकाराने सुरू झालेली ही योजना महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत आहे.
———————————————————————————–