मुंबई | प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यातील पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा चांगल्याच गाजू लागल्या आहेत. शिवसेना (शिंदे गट) च्या अनेक आमदार आणि मंत्र्यांविरोधात वादग्रस्त प्रकरणे समोर येत असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राजकीय दबाव वाढत आहे. त्यातच शिंदे यांचा अचानक दिल्ली दौरा आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत संभाव्य चर्चा, यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे प्रकरण अद्याप शांत झाले नसताना, मंत्री संजय शिरसाट यांच्या ‘कॅश बॅग’ प्रकरणानेही खळबळ उडवली. या दोन्ही घटनांमुळे जनतेत नाराजी तर निर्माण झालीच, पण भाजपच्या गोटातूनही असंतोष व्यक्त करण्यात आला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या या वर्तनावर जाहिरपणे नाराजी व्यक्त केली होती.
याचदरम्यान, शिवसेना नेते रामदास कदम यांचे सुपुत्र आणि सध्याचे गृहमंत्री योगेश कदम यांचे नवे ‘सावली बार’ प्रकरणात समोर आले आहे. यामुळे सरकारची आणि विशेषतः शिवसेनेची प्रतिमा डागळली आहे. या सर्व प्रकरणांमुळे एकनाथ शिंदे बॅकफुटवर गेले होते. त्यांनी अधिवेशनात स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु भाजप नेत्यांमध्ये याबाबत अस्वस्थता वाढली आहे.
संजय गायकवाड यांचे मारहाणीचे प्रकरण, संजय शिरसाट यांची कॅश बॅग प्रकरणातील अडचण, गृहमंत्री योगेश कदम यांच्यावर सावली बार प्रकरणाचा ठपका, देवेंद्र फडणवीस यांची जाहीर नाराजी, भाजप-शिवसेना युतीत निर्माण झालेली तणावाची स्थिती ही पार्श्वभूमी लक्षात घेता, शिंदे यांचा अचानक दिल्लीत जाणे, उद्योगमंत्री उदय सामंत यांची त्यांच्यासोबत बैठक, आणि केंद्रीय नेत्यांसोबत होणाऱ्या गुप्त भेटी यामुळे मंत्रिमंडळात फेरबदल निश्चित असल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेनेतील वादग्रस्त मंत्र्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर भाजप आग्रही असल्याचे बोलले जात आहे.
————————————————————————————-