कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कधीकाळी “अमक्याचा पाव्हणा ”, “ तमक्याचा माणूस ” अशी ओळख असलेल्यांना काँग्रेसमध्ये सहजपणे पदं मिळायची. मात्र, आता कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीत वशिल्याऐवजी निष्ठा आणि कार्यक्षमता या निकषांवर पद देण्याची नवी परंपरा सुरू करण्यात आली आहे. निष्ठावान आणि पक्षासाठी अहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षसंघटनेत स्थान देण्यासाठी काँग्रेसने पदभरतीची अधिकृत प्रक्रिया सुरू केली आहे.
यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, १ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील अध्यक्ष तसेच विविध सेल प्रमुखांशी समन्वय साधून इच्छुक कार्यकर्त्यांच्या प्राथमिक मुलाखती घेतल्या जाणार आहेत. यानंतर १७ ऑगस्ट रोजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष सतेज पाटील स्वत: जिल्हा काँग्रेस कार्यालयात अंतिम मुलाखती घेणार आहेत.
या प्रक्रियेमार्फत पुढील विभागांमध्ये कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे :
महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय ( विद्यार्थी संघटना ), अनुसूचित जाती विभाग, अल्पसंख्याक विभाग, इतर मागासवर्गीय ( ओबीसी ) विभाग, पर्यावरण विभाग, असंघटित कामगार विभाग, किसान व खेत मजदूर काँग्रेस, भटक्या जाती व विमुक्त जमाती विभाग, विधी व मानवाधिकार विभाग, माहिती अधिकार विभाग, विज्ञान, तंत्रज्ञान व कौशल्य विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, निराधार व निराश्रित व्यक्ती विकास विभाग, उद्योग व वाणिज्य विभाग, डॉक्टर सेल, घरेलू कामगार सेल, अपंग विकास व मार्गदर्शक विभाग, सफाई कामगार सेल, सहकार सेल, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, सांस्कृतिक सेल व लोककलावंत विभाग
आमदार सतेज पाटील – कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक गावात, वाड्यावस्तीवर कोणताही राजकीय लाभ न घेता काम करताना दिसतात. अनेक निष्ठावान आणि सक्षम कार्यकर्ते पक्षासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांना संघटनेत योग्य स्थान आणि जबाबदारी देणे हे आमचे कर्तव्य आहे.
या प्रक्रियेसाठी सचिव संजय पोवार-वाईकर आणि विजयानंद पोळ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्हा काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण होणार असून, जमीन स्तरावर कार्य करणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्यांना आता थेट नेतृत्वात स्थान मिळणार आहे.
——————————————————————————————






