निकालात कोकण विभाग प्रथम कोल्हापूर विभाग द्वितीय
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इ. १० वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदा राज्याचा निकाल ९४.१० टक्के लागला. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला असून या पाठोपाठ कोल्हापूर विभागाचा निकाल आहे. नागपूर विभाग सर्वात मागे आहे. एकूण, १५ लाख,४६ हजार ,५७९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १४ लाख,५५ हजार,४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यावर्षीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९८.८२ टक्के लागला आहे. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ९०.७८ टक्के आहे. “सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९८.८२ टक्के ) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (९०.७८%) आहे,” असे बोर्डाने सांगितले.
या परीक्षेसाठी राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख,५८ हजार,०२० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी १५ लाख,४६ हजार ,५७९ विद्यार्थी परीक्षेस बसले आणि त्यापैकी १४ लाख,५५ हजार,४३३ विद्यार्थी पास झाले. यामुळे एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.१० टक्के आहे.
खाजगी विद्यार्थ्यांमध्ये २८हजार,५१२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८ हजार,०२० विद्यार्थी परीक्षेस हजर झाले आणि २२ हजार,५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८०.३६टक्के आहे.
नियमित, खाजगी आणि पुनर्परीक्षार्थी मिळून एकूण १६ लाख,१० हजार,९०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख,९८ हजार,५५३ विद्यार्थी परीक्षेस बसले आणि १४लाख,८७ हजार,३९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.०४ टक्के आहे.
यावर्षी एकूण ६२ विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे, म्हणजे त्या विषयांमध्ये बसलेले सर्व विद्यार्थी पास झाले आहेत. “माध्यमिक शालान्त (इ.१० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ करीता एकूण ६२ विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी एकूण २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे,” असे बोर्डाने सांगितले.
राज्यातील २३,४८९ शाळांमधून १५,५८,०२० नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ७,९२४ शाळांचा निकाल १००% लागला आहे. याचा अर्थ, या शाळांमधील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. “राज्यातील २३,४८९ माध्यमिक शाळांतून १५,५८,०२० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७,९२४ शाळांचा निकाल १०० % लागला आहे,” असे बोर्डाने सांगितले.
विभागनिहाय निकालाची टक्केवारी अशी
कोकण – ९९.८२
कोल्हापूर – ९६.७८
मुंबई – ९५.८४
पुणे – ९४.८१
नाशिक – ९३.०४
छत्रपती संभाजी नगर – ९२.८२
लातूर – ९२.७७
अमरावती ९२.९५
नागपूर – ९०.७८



