कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये मार्च २०२६ पर्यंत ५५०० सहाय्यक प्राध्यापक आणि २९०० शिक्षकेतर पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी वित्त आणि नियोजन विभागाने मान्यता दिली असून, लवकरच सरकारी ठराव जारी होईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २८ व्या दीक्षांत समारंभात बोलत असताना त्यांनी विद्यापीठातील भरतीसंदर्भात ही घोषणा केली.
यापूर्वी ७०० सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी मान्यता मिळाली होती, परंतु माजी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी सुचवलेल्या नवीन पद्धतीमुळे ती प्रक्रिया थांबली. आता नवीन राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे ही प्रक्रिया पुढे जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.
पाटील यांनी विद्यापीठांना परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचे आवाहन केले. यंदा एका एजन्सीमार्फत ६५ देशांतील ४००० विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात प्रवेश घेतला, विशेषतः पुणे आणि मुंबईला पसंती मिळाली. यामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्राची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख वाढत आहे.
तरुणांमध्ये सामाजिक परिवर्तन घडवण्याची प्रचंड क्षमता आहे. स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया यासारख्या उपक्रमांनी तरुणांसाठी संधी उपलब्ध झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. सहाय्यक प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती ही राज्य सरकारची शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढवण्याची महत्त्वाची पायरी आहे. ही प्रक्रिया लवकर पूर्ण होऊन उच्च शिक्षणाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
—————————————————————————————————