कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
भारतीय पर्यटन क्षेत्रामध्ये आगामी काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या वाढीमुळे सुमारे ५० लाख नवीन नोकऱ्या निर्माण होणार असल्याची माहिती एका ताज्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.
कॅपिटल माईंड या संस्थेने पर्यटन क्षेत्रातील रोजगाराच्या संधी या विषयावर अभ्यास करून अहवाल सदर केला. या अहवालानुसार, देशातील पर्यटन क्षेत्र हे केवळ स्थानिकच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही अधिक आकर्षक बनत चालले आहे. सरकारच्या विविध पर्यटनवर्धक योजना, पायाभूत सुविधांचा विकास, तसेच डिजिटल माध्यमांद्वारे पर्यटन स्थळांचे प्रचार-प्रसार यामुळे या क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत आहे.विशेषतः ग्रामीण पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, आणि आध्यात्मिक पर्यटन यांसारख्या उपविभागांमध्ये वाढती मागणी दिसून येत आहे. त्यामुळे पर्यटनाशी संबंधित हॉटेल, प्रवास, मार्गदर्शन, इव्हेंट व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.
उद्योगतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर ही वाढ अशीच कायम राहिली, तर पर्यटन क्षेत्र भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) मोठा वाटा उचलू शकेल, आणि बेरोजगारीच्या समस्येवरही सकारात्मक परिणाम होईल.
पर्यटनाचे प्रकार :
धार्मिक, ऐतिहासिक, शेती, भौगोलिक, निसर्ग, आयुर्वेद, योग आणि वेलनेस,साहसी पर्यटन, इको टुरिझम, समुद्र पर्यटन, हिवाळी पर्यटन, शैक्षणिक प्रयत्न, सांस्कृतिक पर्यटन.
रोजगाराच्या संधी कोणत्या :
गाईड, दुभाषी, हॉटेल्स, रिसॉर्टस, व्यवस्थापक, शेफ, स्वच्छता कर्मचारी, ग्राहक सेवा, रुग्णालये, औषध दुकानं, वाहतूक सेवा , वस्तू विक्रीची दुकानं, कलाकार, फोटोग्राफर, व्हिडीओ व्यवसायिक.
पर्यटन क्षेत्रातील रोजगार आणि बाजारपेठेतील वाढ प्रामुख्याने देशांतर्गत पर्यटनामुळे होत आहे. मोठ्या शहरांमधील नागरिक आता शांत आणि निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या ठिकाणी सुट्टी घालवण्याला प्राधान्य देत आहेत. यामुळे लहान शहरे आणि गावांमध्ये होम स्टे, रिसॉर्टस् आणि स्थानिक सेवांची मागणी वाढली आहे. यामुळे स्थानिक पातळीवर अनेक व्यवसाय आणि नोकऱ्यांची निर्मिती होत आहे.
सध्या पर्यटन क्षेत्राचा जीडीपीमधील वाटा ७ टक्के आहे. २०२८ पर्यंत हा वाटा वाढण्याची अपेक्षा आहे, कारण या क्षेत्रात ५.१ लाख कोटी रुपये (59 अब्ज डॉलर) उत्पन्न अपेक्षित आहे, ज्यामुळे रोजगार आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. असा पर्यटक अभ्यासकांचा अंदाज आहे.
———————————————————————————————–