
देशाची राजधानी दिल्लीतील हवा प्रदुषण कमी करण्यासाठी दिल्लीत सत्तेवर आलेल्या अनेक सरकारनी वेगवेगळे प्रयत्न व प्रयोग केले परंतु दिल्लीच्या प्रदुषणाने कुणालाच दाद दिली नाही. अखेर राजधानीतले हट्टी प्रदुषण ते!
मागील केजरीवाल सरकारने हरियानात जाळत असलेल्या शेतातील पालापाचोळ्यावर निर्बंध आणण्यापासून ते त्यांना पैसे देईपर्यंत व वाहनांना ऑड/ईव्हन दिवशी रस्त्यावर येण्यास परवानगी/बंदी, रस्त्यावर पाणी मारणे ते शहरातील बांधकामावर बंदी आणण्याच्या उपाय योजना केल्या. आता केंद्रात व दिल्ली केंद्रशासित मधे सत्तारूढ असलेल्या भाजप दिल्ली मंत्रीमंडळातील पर्यावरण मंत्री मनजिंदर सिरसा यांनी विडा उचलला आहे.
दिल्ली पर्यावरण मंत्री मनजिंदर सिरसा यांनी आज पर्यावरण विभागातील अधिकारी वर्गाशी मिटींग मधे बोलताना 31 मार्च नंतर 15 वर्षे जुन्या झालेल्या वाहनांना पंपावरून इंधन पुरवले जाणार नाही असे सांगितले. कारण जुन्या वाहनाद्वारे वाहनातून उत्सर्जित कार्बन कणामुळे हवा प्रदुषित होते. तसेच दिल्लीतील उंच इमारती – स्कायस्क्रॅपर्स, मोठी व उंच हॉटेल्स, ऑफीसेसच्या उत्तुंग इमारती, दिल्ली विमानतळ आणि बांधकामे सुरू असलेल्या कन्स्ट्रक्शन साईट्स या सर्वांना हवेतील प्रदुषण कमी करण्यासाठी पाणी बारीक तुषारांच्या स्वरूपात फवारणी करणा-या यंत्रणा (ॲन्टी स्माॅग गन्स) बसवणे बंधनकारक राहील याच सह मागील ‘आम आदमी पक्षाने’ हवेचे प्रदूषण पुरेशा गांभीर्याने घेतले नाही व निधी व्यवस्थित वापरला नाही असेही ते म्हणाले.
(स्माॅग हे धुक्यात धूर , धुळ मिसळले की तयार होते. पाणी बारीक तुषारांच्या स्वरूपात फवारल्यावर पाण्याच्या कणांचा हवेतल्या धुळीच्या, पेट्रोलच्या कार्बन कणाशी संयोग होउन खाली येऊन हवा स्वच्छ होते )
पर्यावरण मंत्र्यानी हवा प्रदुषणावर 3 तास बैठक घेतली. दिल्लीतील हवा प्रदुषण हे धुळीमुळे , वाहनामुळे व अविरत सुरू असलेल्या बांधकामामुळे होत असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मदतीने वृक्ष लागवड करण्याचे व ओसाड असलेल्या जमिनी वृक्षाच्छादित करण्याचे नियोजनही त्यांनी सांगितले.



