बहुचर्चित व सर्व जग वाट पहात असलेला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुटीन यांच्यातील युक्रेन व रशिया यातील युद्ध विरामाबाबतचा फोन काॅल अखेर काल झाला. दोन तासावर चर्चा झाली. अर्थात हा वेळ दुभाषी दोन्ही बाजूकडून होणा-या विधानांचा अनुवाद करत असल्याने लागला आहे.
निष्पन्न दोन गोष्टी – 1. 30 दिवस एकमेकांच्या उर्जा (एनर्जी) निर्मिती केंद्रावर हल्ले करायचे नाहीत 2. रशियासोवत त्वरित पुढील व्यापक युद्धविरामाबाबत वाटाघाटी सुरू करायच्या ! पुटीन यांनी हे निमित्त साधून आपल्या जुन्या अटी तशाच ठेवल्या आहेत. त्या म्हणजे रशियाने मिळवलेला युक्रेनचा प्रांत कायमस्वरूपी रशियाकडे राहिल, पाश्चिमात्य देशांनी घातलेले निर्बंध मागे घ्यावेत, युक्रेनने फेरनिवडणूका घ्याव्यात (थोडक्यात सध्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की नकोत) , नाटोने नियंत्रणात रहावे इ. प्रेसिडेंट ट्रम्प करू पहात असलेल्या अंतरराष्ट्रीय शांतता (अधिक इतर बरेच काही) डील मधिल ही दुसरी डील. पहिली डील इस्रायल व हमास मधिल. इस्रायलने हल्ला चढवून ती कशासाठी आहे हेच अप्रत्यक्षपणे दाखवले आहे. दुसरी डील सुरू आहे रशिया-युक्रेन मधिल शांतता व इतरही बरेच काही. आता रशिया बधले नाही तर ‘बिझीनेसमन ट्रम्प’ – ‘प्रेसिडेंट ऑफ युएसए’च्या अवतारात अवतीर्ण होणार काय? ‘राॅयटर’ वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार यात रशिया अमेरिकेबरोबर संबंध सुधारून ‘युरोप’ ला एकटे पाडेल.
या युद्धात 2लाखापेक्षा जास्त बळी पडले आहेत आणि लक्षावधी लोक विस्थापित झाले आहेत. पुटीन यांनी एनर्जी सेक्टरवरिल हल्ले बंद करावेत असे रशियन सेनेस आदेश दिले आहेत. येत्या रविवारी सौदी अरेबियाच्या राजधानी जेद्दाह मधे पुढील बैठक आहे.
रशियाने युक्रेन वर आक्रमण करून तीन वर्षे झाली. लाखो युक्रेनीयन्स देश सोडून गेले. लाख सैनिकांच्या आसपास रशियन सैन्य संपले. रशियाने पुर्व युक्रेनचा थोडाथोडका नाही तर तब्बल 20% भूभाग व्यापला. युरोप, अमेरिकेने लक्षावधी डाॅलर्सची आर्थिक मदत शस्त्रास्त्रांसह केली. युक्रेनचे ड्रोनचे हल्ले माॅस्को पर्यंत पोहोचले. रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यात आले. युरोपचा एनर्जी सप्लाय रशियाने अडवण्याची भाषा सुरू केल्यावर युरोपच्या एकीत फुटीरता दिसू लागली, युक्रेनचे सैन्य अपुरे पडू लागले.
रशियाने जेलमधे डांबलेले सर्व त-हेचे गुन्हेगार फ्रन्टला आणून त्यांची सरेआम कत्तल घडवून आणली. फारकाय युक्रेन मधिल चिमुरडी सुध्दा रशियाने पळवून नेली. सुसंस्कृत, कलासक्त व उद्योगी युक्रेन मधिल मध्यमवर्ग एकतर इतर देशात जाऊन कसाबसा जगू लागला वा बेचिराख झाला. रशियातील भाडोत्री सेनेने पुटीन यांच्याविरुद्ध बंडाळी माजवण्याचा प्रयत्न केला. गव्हाचे कोठार असलेल्या युक्रेनमधून गहु बाहेर काढता येईनासा झाल्यावर त्यावर अवलंबुन असलेल्या आफ्रिकन देशांचे धाबे दणाणले.
रशियन ऑईल खरेदी करणा-या देशावर आर्थिक निर्बंध लागू झाले. युरोप झाकोळला.तिसरे महायुद्ध होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. संपुर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेले रशिया युक्रेन युद्ध अचानक दुस-या क्रमांकावर ढकलले गेले ते इस्रायल व हमास युद्धाने.
हमासच्या इस्रायलवरच्या 7 ऑक्टोबर 2023 च्या हल्यानंतर जगाने युद्धालाही मागे टाकणारा ‘गाझा स्ट्रीप’ च्या चिंचोळ्या पट्टीतला इस्रायलने केलेला अमानुष नृसंहार पाहिला ! लहान, थोर, वृद्ध,आजारी, स्त्री, पुरूष, दवाखाने,इस्पितळे, रेड क्राॅस, संयुक्त राष्ट्रसंघाची कार्यालये काही यातून सुटले नाही. 50000 पेक्षा जास्त लोक ठार झाले यात 166 वार्ताहर व प्रसारमाध्यमाशी निगडीत लोकांचाही समावेश आहे (लॅन्सेट). 1 लाखापेक्षा जास्त जखमी झाले. पॅलेस्टीनीयन सेंटर फाॅर पाॅलिसी ॲन्ड सर्व्हे रिसर्च).
हे चित्र पुन्हा बदलले ते अमेरिकन निवडणूकांच्या निकालानंतर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर. आधीचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या काळात अब्जावधी डाॅलर्सची आर्थिक व शस्त्रात्रांची मदत करणारी व ठामपणे युक्रेनच्या पाठीशी उभी असलेली अमेरिका बदलली. युक्रेनबाबत ट्रम्प निवडणुकाआधीच म्हणत होते की दुस-या महायुद्धानंतरचा हा सर्वात बिकट बनलेला प्रश्न ते एका दिवसात सोडवू शकतात.
त्या आधी जो बायडेनच्या पुत्राला – हंटर बायदेनच्या विरूद्ध युक्रेनने बोलावे , त्यांना ‘एक्सपोज’ करावे असा आग्रह त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याकडे धरला होता त्याला झेलेन्स्की यांनी दाद दिली नव्हती तेव्हापासून झेलेन्स्की ट्रम्प यांच्या’बॅडबूक’ मध्ये प्रविष्ट झाले होते. अमेरिकेतील विरोधी अमेरिकन पक्षापेक्षा हाडवैरी रशियाला जवळचे मानणा-या ट्रम्प यांचे रशियन राष्ट्राध्यक्ष पुटीन यांच्याशी संबंध मित्रत्वाचे आहेत. तसाही अमेरिकेत युक्रेनवर फारच खर्च चालला आहे व अमेरिकन टॅक्सपेयर चा घामाचा पैसा उधळला जात आहे असा मतप्रवाह जोर धरत होता.
पहिल्या बैठकीतच ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना घाम फोडला. युद्धाची गोपनीय माहिती पुरवणे बंद केले. खनिज संपत्ती घेतली आणि एक महिना युद्धबंदी प्रस्ताव प्रथम मान्य करून घेतला. सौदी अरेबियात जेद्दाहमधे युक्रेन व अमेरिकी शिष्टमंडळातील 30 दिवसांकरिताचा युद्धबंदीचा प्रस्ताव झेलेन्स्कींनी मान्य केला. आता पाळी रशियाची होती. अमेरिकेच्या युद्धबंदीच्या प्रस्तावाची भलावण करत रशियाने निर्णयासाठी आठवड्याचा काळ घेतला. त्यातही मुख्य युद्धबंदीला फाटा देत एकमेकांच्या उर्जा निर्मिती केंद्रावर व पायाभूत सुविधांवर हल्ला चढवायचा नाही अशी स्वतःला अनकुल अट फक्त मंजूर केली. तज्ञ्यांच्या मते ख-या युद्धबंदीकडे ही वाटचाल नसून केवळ छोटे पाऊल आहे.
ट्रम्पना इस्रायल – हमास मधे युद्धबंदी करून घेताना पश्चिम आखातात असलेल्या अमेरिकन वर्चस्वाचा फायदा झाला होता. इस्रायलचे हेतू जवळपास पूर्ण होत आल्याने त्यांचाही प्रश्न नव्हता. आता मात्र सामना धुर्त व थंड डोक्याच्या पुटीन यांच्याशी आहे. युक्रेनशी सर्वात निकटचे संबंध असलेल्या युरोपला तर ट्रम्प यांनी साधे चर्चेत देखिल सहभागी करून घेतलेले नाही.
पाश्चिमात्य देशांनी रशियावर घातलेल्या आर्थिक निर्बंधामुळे रशियाचे आर्थिक चलन फिरवणा-या उर्जा केंद्रावरचे युक्रेनचे ड्रोन व मिसाईलद्वारे हल्ले रशियाला अडचणीत आणू लागले होते. त्यातून त्यांना 30 दिवसासाठी मुक्तता मिळाली. आपली पूर्व युक्रेनवरिल पकड ते अधिक मजबूत करतील. युक्रेनला यात काय मोल द्यावे लागेल यामुळे झेलन्स्की व सध्या तरी रशिया अनकुल अमेरिकेशी बदलत्या संबंधामुळे युरोप हवालदील होत चालल्याचे चित्र आहे.