कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्य सरकारने राज्यातील देवस्थानांचे रूपडे पालटण्यासाठी महत्त्वाचे शासन निर्णय प्रसृत केले. त्यात अष्टविनायक मंदिरांच्या जीर्णोद्धार आणि विकासासाठी १४७.८१ कोटी रुपये, कोल्हापूरच्या श्री क्षेत्र जोतिबा मंदिर विकासासाठी पहिल्या टप्प्यात २५९.५९ कोटी रुपये आणि तुळजापूरच्या तुळजाभवानी देवी मंदिर विकासासाठी १ हजार ८६५ कोटी रुपयांभरघोस निधीला मंजुरी देण्यात आली.
अष्टविनायक मंदिरांच्या जीर्णोद्धार आणि विकासासाठी २०२१-२२ मध्ये ९२ कोटी १९ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानंतर २०२४ मध्ये १४७ कोटी ८१ लाखांचा सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला. अष्टविनायकांच्या जीर्णोद्धाराच्या प्रस्तावाला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या माध्यमातून ६ मे २०२५ रोजीच्या चौंडी येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता घेण्यात आली. त्यानंतर दोन आठवड्यातंच १४७ कोटी ८१ लाख खर्चाचा सुधारित प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय बुधवारी जारी झाला.
पुणे जिल्ह्यातील मोरगावच्या श्रीमयुरेश्वर मंदिरासाठी ८ कोटी २१ लाख, थेऊरच्या श्रीचिंतामणी मंदिरासाठी ७ कोटी २१ लाख, ओझरच्या श्रीविघ्नेश्वर मंदिरासाठी ७ कोटी ८४ लाख, रांजणगावच्या श्रीमहागणपती मंदिरासाठी १२ कोटी १४ लाख, रायगड जिल्ह्यातील श्रीवरदविनायक मंदिरासाठी २८ कोटी २४ लाख रुपये, पालीच्या श्रीबल्लाळेश्वर मंदिरासाठी २६ कोटी ९० लाख, अहिल्यानगरच्या श्रीसिद्धटेक मंदिरासाठी ९ कोटी ९७ लाख रुपये मंजूर करण्यात आले. विद्युतीकरण, रोषणाई, वास्तूविशारद, जीएसटी आदी खर्चासाठी ४७ कोटी ३९ लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्यामुळे अष्टविनायक क्षेत्राच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.
जोतिबा मंदिर परिसरात विविध कामांचे नियोजन –
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कोल्हापूरच्या श्री क्षेत्र जोतिबा मंदिर येथील विकास कामांसाठीही मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या विकास आराखड्याअंतर्गत श्री जोतिबा मंदिर संवर्धन व दुरुस्ती, यमाई मंदिर संवर्धन व दुरुस्ती, श्री जोतिबा डोंगरावर येणाऱ्या पायवाटा संवर्धन व सुशोभीकरण, डोंगरकड्यांचे संवर्धन, देवस्थान समिती/प्राधिकरणासाठी नवीन कार्यालय, दोन ठिकाणी ज्योतस्तंभाची निर्मिती, नवे तळे परिसर विकसित करणे, केदार विजय गार्डन निर्मिती, यमाई परिसर विकास (चाफेवन) करणे, कर्पूर तलाव संवर्धन आदी कामांना बुधवारी मान्यता देण्यात आली. या कामांवर पहिल्या टप्प्यात २५९.५९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, त्यापैकी ८१.६० कोटींच्या कामे थेट नियोजन विभागामार्फत करण्यात येणार आहेत. ही सर्व विकासकामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे नियोजन आहे.
तुळजाभवानी मंदिर विकासाचा मार्ग मोकळा-
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवी मंदिर विकासासाठी १ हजार ८६५ कोटी रुपयांच्या आराखड्यास राज्य सरकारच्या वित्त व नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली. देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान तुळजापूर येथे आहे. देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविक मोठ्या संख्येने येत असतात. नवरात्रीच्या काळात मंदिरात मोठा उत्सव, भक्तांची गर्दी असते. ऐतिहासिक, आध्यात्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या तुळजाभवानी देवस्थानच्या विकासाच्या दृष्टीने हा शासन निर्णय महत्त्वाचा मानला जातो. स्थानिक पातळीवरील सर्व संबंधितांशी चर्चा करून श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा व लागणारा निधी यांचा आराखडा धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केला.
—————————————————————————————————