कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यस्तरावर दि.२१ मे रोजी झालेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर कृषी विभागातील योजनांसाठी राज्यातील शेतकऱ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलद्वारे झालेली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील २ हजार ४६९ शेतकऱ्यांची निवड झाली असून १३.२८ कोटी रुपयांचा लाभ त्यांना मिळणार आहे.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर कृषी विभागाच्या योजनांसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना मोबाईलवर तसे एसएमएस पाठविण्यात आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे, अशा शेतकऱ्यांनी येत्या १० दिवसांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करायची आहे असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांच्या कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.
वरील पूर्तता केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना लगेचच पूर्व संमती मिळणार आहे. फार्मर आयडी च्या आधारे लॉग ईन केल्यानंतर पुढील माहिती मिळू शकेल. ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी काढला नसेल त्यांनी जवळील सीएससी केंद्रातून काढून घ्यावा. पात्र लाभार्थ्यांकडून येत्या १० दिवसात कागदपत्राची पूर्तता न झाल्यास तो अर्ज आपोआप रद्द होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील योजनानिहाय लाभाची निवड व रक्कम –
- शेती यांत्रिकीकरण- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २७ अर्जांसाठी लाभाची एकूण रक्कम ३२ लाख २५ हजार कृषि यांत्रिकीकरण उप-अभियानात १५८६ शेतकऱ्यांना ८ कोटी ५० लाख ११ हजार ४०० रुपये
- सिंचन क्षेत्रात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेत वैयक्तिक शेततळे साठी २६१ शेतकऱ्यांना १ कोटी 37 लाख ९१ हजार ३५७ रूपये
- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात १२ अर्जांसाठी ९ लाख ८५ हजार ९६४ लाभाची रक्कम.
- प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना प्रत्ति थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन घटक) या अंतर्गत ३७४ अर्जांसाठी १ कोटी ५९ लाख २९ हजार २७६ रुपये लाभाची रक्कम आहे.
- आरकेव्हीवाय शेततळ्याला प्लास्टिक आच्छादन साठी १४९ अर्जांसाठी ८२ लाख १० हजार ४०२ लाभाची रक्कम आहे.
- फलोत्पादन घटकांतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 60 अर्जांसाठी ५७ लाख ३८ हजार १५५ रुपयांच्या लाभाची रक्कम आहे.
अशा प्रकारे एकूण २ हजार ४६९ अर्जांच्या निवडीनंतर १३ कोटी २८ लाख ९१ हजार ५५४ रुपयांची लाभाची रक्कम जिल्ह्यासाठी आहे.
————————————————————————————–



