ग्लोबल वॉर्मिंग मुळे जगातील वातावरणाचे पॅटर्न झपाट्याने बदलत आहेत. उत्तर ध्रुवावरचे बर्फाचे आईसबर्ग हीट वाढून समुद्रात तरंगत वितळणे , काही ठिकाणचे तापमान वाढणे तर काही ठिकाणी अती वृष्टी होणे, पाऊस गायब होणे, दुष्काळ पडणे, जंगले पेटणे, वणवे पसरणे, कमी वेळेत प्रचंड ढगफुटीसारखा पाउस पडणे आदी असंख्य पॅटर्न्स! यात ग्लोबल वॉर्मिंग – त्याचे दुष्परीणाम याचे कोणालाही सोयर सूतक नाही. मुळात असे काही घडते आहे, त्याचे वैश्विक परिणाम आहेत यावरच विविध क्षेत्रात जागतिक पातळीवर आघाडीवर असणाऱ्या नामवंत लोकांचा विश्वास नाही. यातूनचआईस बर्गची राजधानी असलेल्या ग्रीनलँड मधील वितळते आईसबर्ग आजवर त्याखाली झाकलेला मुबलक खनिज संपत्तिचा खजिना वर आणत आहेत. आणि त्यावर अनेक राष्ट्रांची नजर पडली आहे.
ग्रीनलँडच्या बाबतीत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बर्फ वितळू लागल्याने ग्रीनलँडचा समुद्र आता खुला होत आहे. ग्रीनलँड उत्तर अमेरिकेत आहे त्यामुळे उत्तर अमेरिका – युरोप – आर्क्टिक झोन असा नवीन सागरी मार्ग आता तयार होतोय. या दोन मुद्यामुळे आणि अर्थात अमेरिकेचे प्रेसिडेंट ट्रम्प यांना हवे असल्याने ग्रीनलंड आंतरराष्ट्रीय प्रकाशझोतात आले आहे. दुर्मिळ खनिजे – रेअर अर्थ मेटल्सचे चीन बाहेरचे सर्वात मोठे साठे ग्रीनलॅड मधे आहेत व यातील बहुतांश खनिजे अत्याधुनिक ए आय ते इलेक्ट्रिक कार व मोबाइल साठीची बॅटरी या साठी जगभरात डीमांड मध्ये आहेत. आत्ताच्या सुपरपॉवर च्या स्पर्धेत ही सर्व खनिजे महत्वाची बनली आहेत.
ग्रीनलँडचे क्षेत्रफळ २१ लाख ६६ हजार स्क्वेअर किमी आहे आणि लोकसंख्या पहिली तर केवळ ५६ हजार म्हणजे एक स्क्वेअर किमी मध्ये १ माणूस देखील नाही. ८०% भूभाग कोणत्याही मानवी वस्ती शिवाय. १८ व्या शतकात डेन्मार्कच्या लोकानी ग्रीनलँड मध्ये वसाहत केली आणि ग्रीनलँड डेन्मार्कचा भाग बनले. डेन्मार्क व नॉर्वे यांचा मिळून आधी एक देश होता . १८१४ मध्ये डेन्मार्क व नोर्वे एकमेकपासून स्वतंत्र झाले (त्या आधी डेन्मार्क, स्वीडन व नॉर्वे एकाच राजवटी खाली होते आणि १३१० ते १८१४ नॉर्वे डेन्मार्क बरोबर होते ) आणि ग्रीनलँड डेन्मार्ककडे आले. दुसऱ्या जागतिक महायुद्धात जर्मनीने डेन्मार्क वर आक्रमण केले तेव्हा ग्रीनलंडला अमेरिकेने संरक्षण दिले व १९४५ साली पुनः डेन्मार्कला परत दिले. १९५३ मध्ये ग्रीनलँडचा वसाहतीचा दर्जा डेन्मार्कने रद्द करून आपल्या देशात सामावून घेतले. त्यानंतर १९७९ व २००९ मधील नियमानुसार ग्रीनलँडला परराष्ट्र व संरक्षण आदि महत्वाची खाती सोडून जास्तीतजास्त स्वायत्तता देण्यात आली.
खटका उडाला तो अलीकडे २१ व्या शतकात. डेन्मार्कने अमेरिकेस ग्रीनलँड मध्ये असलेल्या ‘मिसाईल बेस’ मधे सुधारणा करून अद्ययावत करणेस अमेरिकेस संमती दिल्यावर. हा अमेरिकन बेस इनयूएट हे ग्रीनलँड चे जूने रहिवासी आहेत त्यांना अमेरिकेने बळजबरीने हुसकावून लावून तयार केला. त्यांनी युरोपियन मानवी हक्क न्यायालयात कैफियत मांडल्याबद्धल त्यांचे परतीचे अधिकार हिरावून घेतले. असा हा टूली एअर बेस १९५० मध्ये अमेरिकेने तयार केला. त्यानंतरच्या अमेरिका व सोविएत रशियाच्या शीत युद्धाच्या काळातही ग्रीनलँडला कल्पना न देता अमेरिकेने अणूबॉम्ब ग्रीनलँड बेटावर ठेवले होते. आणि त्याहून वाईट म्हणजे १९६८ मध्ये ४ हायड्रोजन बॉम्ब घेऊन जाणारे अमेरिकेचे लष्करी विमान टूली शेजारी कोसळले होते. स्वतंत्र ग्रीनलँड चे पडघम त्यानंतर घुमू लागले. २००९ च्या सार्वमतात ७५% ग्रीनलँडवासियानी अधिक स्वायत्ततेला झुकते माप दिले. डेन्मार्कने या बाबतीत ग्रीनलँड ला खुली साथ दिली असे म्हणावे लागेल. त्यांनी ग्रीनलँड वर परराष्ट्रीय धोरण, स्थलांतर, न्याय या सह वितळत्या बर्फामुळे उत्खननास सोपे व्हायला लागलेले हायड्रोकार्बन व खनिजे यांचेही वाढते हक्क दिले.लोकशाही पद्धतीने नंतर अनेक सरकार स्थापन झाली व त्यांनी कामही केले.
मध्यंतरी जेव्हा ‘नाटो’ चे सेक्रेटरी जनरल मार्क रूटा यांनी अमेरिकेस भेट दिली तेव्हा अमेरिकेन कॉंग्रेस च्या संयुक्त सत्रात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले अमेरिकेस ग्रीनलँड हवे आहे. कसेही करून आपण ते घेणारच आहोत. आपल्याला ते (ग्रीनलँड ) अंतरराष्ट्रीय सुरक्षे साठी पाहिजे! सध्या बरेच देश ग्रीनलँड भोवती समुद्रपर्यटन करत आहेत!(हा टोला चीनला) डेन्मार्कचा यात काही संबंध नाही. डेन्मार्क ग्रीनलँडपासून फार लांब आहे. आणि ते (डेन्मार्क)ग्रीनलँडला आले होते २०० वर्षापूर्वी. सध्या आपले (अमेरिकेचे) २ अमेरिकन बेस तेथे आहेत आणि काही सैनिकही आहेत. तुम्ही जास्तीत जास्त सैनिक ग्रीनलँडला जाताना पहाल….
क्रमशः