प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ११ जून ते १९ जुलै २०२६ दरम्यान होणारा फिफा विश्वचषक २०२६ हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक फायदेशीर ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या स्पर्धेमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत सुमारे ४०.९ अब्ज डॉलर्स (सुमारे ९.९५ लाख कोटी रुपये) इतकी आर्थिक उलाढाल होणार असल्याचा अंदाज फिफाने व्यक्त केला आहे.
फिफाला २०२३ ते २०२६ या चार वर्षांच्या कालावधीत सुमारे १३ अब्ज डॉलर्सचा विक्रमी महसूल मिळेल, जो मागील विश्वचषक सायकलच्या तुलनेत लक्षणीय वाढ दर्शवतो.
विक्रमी बक्षीस रक्कम
२०२६ विश्वचषकासाठी एकूण ६५५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ५,८९५ कोटी रुपये) इतकी बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली असून, ती २०२२ च्या विश्वचषकाच्या तुलनेत तब्बल ४९ टक्क्यांनी अधिक आहे.
विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला ५० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ४५० कोटी रुपये) बक्षीस मिळणार आहे.
संघटनांना आणि क्लबना मोठा लाभ
या स्पर्धेसाठी सहभागी सदस्य संघटनांना एकूण ७२७ दशलक्ष डॉलर्स वितरित करण्यात येणार आहेत. यामध्ये पात्र ठरलेल्या प्रत्येक संघाला तयारीसाठी १.५ दशलक्ष डॉलर्स दिले जातील.
तसेच, खेळाडूंना राष्ट्रीय संघांसाठी सोडणाऱ्या क्लबांना ३५५ दशलक्ष डॉलर्स इतकी विक्रमी रक्कम ‘क्लब लाभ कार्यक्रम’ अंतर्गत दिली जाणार आहे.
तिकीट विक्रीला प्रचंड प्रतिसाद
विश्वचषकाच्या तिकिट विक्रीला जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पहिल्याच टप्प्यात १० लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. काही सामन्यांसाठी ६० डॉलर्स दरात सवलतीची तिकिटे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
नवे स्वरूप, अधिक संघ
२०२६ च्या विश्वचषकात प्रथमच ४८ संघ सहभागी होणार आहेत. संघांना चार संघांच्या १२ गटांमध्ये विभागले जाईल.
प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ आणि सर्वोत्तम तिसऱ्या क्रमांकावरील आठ संघ मिळून ‘राउंड ऑफ ३२’ फेरी खेळली जाईल.
यजमान देश अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे आपोआप पात्र ठरले असून, अर्जेंटिना, ब्राझील, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, स्पेन यांसारख्या प्रमुख संघांसह ४२ संघ आधीच पात्र ठरले आहेत. उर्वरित सहा जागा प्ले-ऑफद्वारे निश्चित होतील.
बक्षीस रक्कम (संघाच्या कामगिरीनुसार)
🏆 विजेते : $50 दशलक्ष
🥈 उपविजेते : $33 दशलक्ष
🥉 तिसरे स्थान : $29 दशलक्ष
चौथे स्थान : $27 दशलक्ष
5–8 वे : प्रत्येकी $19 दशलक्ष
9–16 वे : प्रत्येकी $15 दशलक्ष
17–32 वे : प्रत्येकी $11 दशलक्ष
33–48 वे : प्रत्येकी $9 दशलक्ष





