मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागातील १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) पदोन्नती मिळाली असून, राज्य प्रशासनासाठी हा एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी टप्पा ठरला आहे. केंद्र सरकारच्या पर्सनल, पब्लिक ग्रीवन्सेस अँड पेन्शन मंत्रालयाच्या पर्सनल व ट्रेनिंग विभागाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. ही पदोन्नती जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत रिक्त असलेल्या IAS जागांवर करण्यात आली आहे.
या नियुक्त्या केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) खास प्रक्रियेद्वारे निश्चित केल्या असून, महसूल सेवेतील उत्कृष्ट अधिकारी म्हणून पुढे आलेल्या या अधिकाऱ्यांची निवड भारतीय प्रशासकीय सेवेसाठी करण्यात आली आहे.
या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे : विजयसिंह देशमुख, विजय भाकरे, त्रिगुण कुलकर्णी, गजानन पाटील, महेश पाटील, पंकज देवरे, मंजिरी मनोलकर, आशा पठाण, राजलक्ष्मी शहा, सोनाली मुळे, गजेंद्र बावणे, प्रतिभा इंगळे
या संदर्भात प्रतिक्रिया देताना राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटरवरून या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले, “महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी, यासाठी यासर्व अधिकाऱ्यांना सेवेची नवी महत्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. महसूल विभाग हा महाराष्ट्राचा प्रशासकीय कणा आहे; म्हणून या अधिकाऱ्यांनी आता आपली संपूर्ण क्षमता महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयोगी आणावी अशी सदिच्छा व्यक्त करतो.”
ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्र महसूल सेवेतील अधिकाऱ्यांना मी नेहमीच प्रोत्साहन देत आलो आहे. त्यांच्या कार्यक्षमता, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाचे कौतुक मी सार्वजनिक व्यासपीठांवर तर करतोच, पण विधिमंडळातही त्यांच्या कार्याचा उल्लेख करतो. यामागचा उद्देश एकच शासनाच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात.”
राज्याच्या प्रशासनात या नवीन IAS अधिकाऱ्यांमुळे अधिक गतिमान व परिणामकारक कार्यप्रणाली निर्माण होईल, अशी अपेक्षा राज्य शासनाकडून व्यक्त होत आहे. महसूल विभागाची कार्यसंस्कृती अधिक प्रभावशाली होणार असून, हे अधिकारी जिल्हा स्तरावरील आणि मंत्रालयातील विविध जबाबदाऱ्यांची धुरा लवकरच सांभाळतील.
—————————————————————————————–






