कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
दहावी परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करूनही अकरावी केंद्रीभूत ऑनलाइन प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडले आहे. १० जूनला प्रसिद्ध होणाऱ्या पहिल्या यादीसाठी आता थेट २६ जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
यंदा शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने दहावीच्या शालांत परीक्षा १५ दिवस आधीच सुरू केल्या. दहावीचा निकालही १३ मे रोजी जाहीर करण्यात आला. मात्र आता निकाल जाहीर होऊन महिना होत असूनही अकरावी प्रवेशाची पहिली यादीही जाहीर होण्याची चिन्हे नाहीत. अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या मूळ वेळापत्रकानुसार ही यादी १० जून रोजी म्हणजे मंगळवारी जाहीर होणे अपेक्षित होते. पण आता १२ लाखांहून अधिक नोंदणी झालेल्या विद्याथ्यांच्या ‘डेटा’वर प्रक्रिया करण्यासाठी किमान आठवडाभराचा अवधी लागणार असल्याने पहिली गुणवत्ता यादी २६ जून रोजी जाहीर होणार आहे.
आज तातडीची बैठक घेणार – शिक्षणमंत्री
अकरावी प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणींमुळे दिरंगाई होत असल्याची वस्तुस्थिती माहित आहे. आम्ही हा निर्णय चांगल्या भावनेतून, विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक टाळण्यासाठी घेतला होता, पण अनेक तांत्रिक मुद्दे विचारात घेऊन त्यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. त्यासाठी आज, सोमवारी तातडीने बैठक घेतली जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
पहिलेच वर्ष असल्याने गोंधळ – प्रभारी संचालक
राज्यभर केंद्रीभूत ऑनलाइन प्रवेश राबवण्याचे हे पहिलेच वर्ष आहे. १२ लाख विद्याथ्यांच्या ‘डेटा’वर प्रक्रिया करण्यासाठी संस्थेला किमान आठ दिवसांचा अवधी हवा आहे. त्यामुळे आम्ही वेळापत्रकात बदल केला. मात्र अकरावीचे वर्ग ११ ऑगस्ट किंवा महाविद्यालयातील ५० टक्के प्रवेश यापैकी जे आधी होईल, त्या वेळी सुरू करण्याचे स्वातंत्र्य आम्ही महाविद्यालयांना देणार आहोत. विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी दिवाळी सुट्टीत कपात केली जाऊ शकते, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाचे प्रभारी संचालक डॉ. श्रीराम पानझडे यांनी स्पष्ट केले.