अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी घडवून आणलेल्या युक्रेन – रशिया यांच्यातील ३० दिवसांच्या युद्धविरामा बाबत युक्रेन तर आता सहमत झालेले आहे व मागील वृत्त हाती आले प्रमाणे आता निर्णयाचा चेंडू रशियन कोर्टात होता . मुरब्बी पुतीन आणि बिझीनेसमन ट्रंप यात पुतीन पुढे काय पवित्र घेतात व कोणत्या अटी टाकतात यावर सर्व काही अवलंबून होते. रशियाने हे युद्ध समाप्त करण्यासाठी त्यांच्या अटीची यादी सादर केली आहे असे रॉयटर वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. रॉयटरने या सर्व घटनाक्रमाशी संबंधित असलेल्या वॉशिंग्टन मधील दोन व्यक्तींच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. रशिया व अमेरिकेचे अधिकारी गेल्या ३ आठवडयापासून प्रत्यक्ष व व्हर्च्युअल रीतीने एकमेकांच्या संपर्कात आहेत असे रॉयटरने सांगितले आहे. क्रेम लीन च्या अटी त्यांनी या पूर्वी युक्रेनला सादर केलेल्या अटी प्रमाणेच आहेत असे दिसते.
या मध्ये युक्रेनला ‘नाटो’ चे सभासदत्व द्यायचे नाही, परदेशी सैनिक युक्रेनच्या भूमीवर पाठवायचे नाहीत आणि त्याहून महत्वाचे व वादग्रस्त ठरू शकणारे २०१४ मध्ये रशियाने क्रीमीया गिळंकृत केला होता त्या क्रीमीया सह इतर ४ प्रांतही रशियाचेच राहतील. खरे पाहता रशियाने मागील बायदेन सरकारशी झालेल्या बोलण्यात व इतर माध्यमातून वेळोवेळी या मागण्यांचा उल्लेख केलेला आहे. यात नाटो च्या पूर्व युरोप मधील सध्या सुरू झालेल्या प्रसारापासून ते युक्रेनच्या युरोपेयन युनियन मधील सहभागापर्यंतच्या व युक्रेनने ‘नॉन न्यूक्लिअर’ होणे पर्यन्तच्या अटी होत्या. नाटो चा वेढा रशियाच्या संपूर्ण युरोपच्या बाजूने पडला आहे. एक बेलरूसचा काय तो अपवाद राहीला आहे. युक्रेन स्वतंत्र होण्याआधी रशियाचा एक प्रांत होता आणि नंतर तो पूर्ण युरोपियन जीवन शैलीने व्यापून गेला. २०१४ मध्येच युक्रेनच्या रशिया प्रणीत यानुकोविच शासना विरूद्ध लोकानी आंदोलन करून युक्रेन युरोपिअन युनियन मध्ये सामील झाला पाहिजे अशी संसदेसमोर ठिय्या मारून मागणी केली होती.

युक्रेनला सोविएत रशिया च्या विघटनानंतर स्वातंत्र्य मिळाले. युक्रेनने युरोपिअन युनियन मध्ये जाऊ नये व आपल्या सीमेवर युरोपिअन संघटना उभ्या ठाकूर नये म्हणून पुतीनने जंग जंग पछाडले होते. युक्रेनच्या सरकारमध्ये अनेक सेकंड क्लास थर्ड क्लास दोन नंबरचे व्यवहार करणारे गँगस्टर्स , व्यापारी रशियाने घुसवले होते. नाटो च्या प्रसाराची धास्ती घेतलेल्या पुतीन यांनी बराक ओबामाच्या काळात क्रिमिया कोणत्याही भरीव आंतरराष्ट्रीय विरोधा शिवाय ताब्यात घेतले होते त्यानंतर युक्रेनच्या यानुकोविचला युक्रेन मधून पळून जाऊन रशिया मध्ये आश्रय घ्यावा लागला होता. त्यानंतर ही अमेरिका व युरोपियन राष्ट्रांशी झालेल्या बोलण्या मध्ये रशिया ‘नाटो’ व ‘इयू’ यांच्या पुर्व युरोप मधिल प्रसाराविरुद्ध बोलत राहिले. बायदेन सरकारने युक्रेन च्या युरोपिअन युनियन मध्ये सामील होण्याला विरोध केलेला नाही आणि नाटो च्या वाढत्या प्रभावाला खतपाणीच घातले जात आहे व हे युक्रेन स्वतंत्र होताना झालेल्या बोलण्या विरूद्ध आहे हे लक्षात आल्या नंतर रशियन सेना युक्रेनच्या सीमेवर येउन उभा ठाकल्या. त्यावेळीही रशियन आक्रमण निश्चित आहे असे बायदेन सांगत होते परंतु जगाने दुर्लक्ष केले.
आक्रमणानंतर मात्र चांगलाच घोटाळा झाला. हा हा म्हणत युक्रेन पादाक्रांत करू व तेथे रशियाचे बाहुले असलेले सरकार बसवू या भ्रमात असलेल्या पुतीनना अनपेक्षित तिखट प्रतिकाराला सामोरे जावे लागले. केवळ कागदावर मजबूत असलेली रशियन बलाढ्य सेना अचानक एक्सपोज झाली व स्टँड अप काॅमेडियन ते प्रेसिडेंट असा सत्या पेक्षा ही अद्भुत प्रवास असलेल्या झेलेन्सकींना जगण्याचे ईप्सित सापडले. युरोप व अमेरिकेच्या दृष्टीने बलाढ्य रशियन समोर असताना युक्रेनचा हा प्रतिकार कौतुकास्पद ठरला. अमेरिकेने आश्रय घेण्या साठी आमंत्रित केले असताना झेलेनस्कीचे देश सोडण्यास इन्कार देणे व साध्या टी शर्ट मध्ये सैनिकात मिसळून राहणे युक्रेनला युरोपियन व अमेरिकी लष्करी पाठिंबा व अब्जावधी डॉलरची मदत मिळवून देणारे ठरले.

ही मदत आणि ट्रम्प यांनी नंतर हंटर बायदेन (जो बायदेन यांचे पुत्र) प्रकरण समोर आणून झेलेन्स्की यांना बायदेन विरोधी जायला सांगितले परंतू झेलेन्सकी यांनी प्रतिसाद दिला नाही. ट्रम्प च्या नजरेत ते युद्धपिपासू ठरले. जवळ जवळ निर्जीव होत जाणाऱ्या युद्धात ट्रम्प चे अचानक अमेरिकन इलेक्शन जिंकणे रशियाला संजीवनी देऊन गेले. आत्ताही जर खरोखरच युद्ध बंदी युक्रेन बरोबर झाली तर रशिया उर्वरित युरोप बरोबर कसे संबंध ठेवणार आहे हे कोणीही सांगू शकत नाही. आत्ता तरी युरोप व अमेरिकेत एका मर्यादे पर्यन्त अंतर पडले आहे हेही कोणी नाकारू शकत नाही.

दरम्यान ताजे वृत्त हाती आले तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले प्रमाणे अमेरिकेचे शिष्टमंडल रशियास रवाना झाले असून यात ही ट्रम्प यांचे विधान ‘आर्थिक दृष्ट्या अजूनही पुढील कारवाई करता येऊ शकते परंतु मी करत नाही कारण मला शांती प्रस्थापित करायची आहे’ ही ‘डील’ ट्रम्प यांच्या बिझीनेस (दबाव) शैलीतच सर्व चालले आहे हे दाखवते. प्रश्न आहे तो पश्चिमेच्या आर्थिक निर्बंधांना महत्व न देता गेली ३ वर्षे ‘सर्व्हाय’ झालेला रशिया अमेरिकेने पुढे केलेल्या मैत्रीच्या व त्याआडून बिझीनेस च्या हाताला किती किमत देते याचा. डील सक्सेस झाल्यास व त्यात ट्रम्प ची अमेरिकेत अथवा जगात किंमत वाढल्यास त्याचे काही घेणे देणे क्रेमलीनला नाही. पूर्व युक्रेनचा ताब्यात आलेला रशियाच्या सीमेला लागून असलेला भाग (क्रीमीयासह) मिळाला तर खरा फटका बसणार आहे तो युक्रेन आणि युरोपलाच ! बाकी अमेरिकेची काळजी घेण्यास चीन व खुद्द ट्रम्प पुरेसे आहेतच.