महिला उद्योजकांनी उपलब्ध संधींचा लाभ तत्परतेने घ्यावा: वैष्णवी अंदूरकर

0
194
Google search engine

कोल्हापूर, दि. १४ मार्च: महिला या मुळातच उत्तम व्यवस्थापक असतात. महिला उद्योजकांना आज अनेकविध प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. त्यांचा लाभ त्यांनी तत्परतेने घ्यावा, असे आवाहन ग्लॅडियन्स ऑटोमेशन कंपनीच्या संचालक वैष्णवी अंदूरकर यांनी केले.

शिवाजी विद्यापीठातील इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि लिंकेंजेस केंद्र, एसयूके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि एमबीए युनिट, वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या वतीने “विकसित भारतातील महिला उद्योजकांची भूमिका” या विषयावर पीएम-उषा अंतर्गत नुकतीच एकदिवसीय कार्यशाळा झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख डॉ. आण्णासाहेब गुरव होते.

सौ. अंदूरकर यांनी आपल्या भाषणात महिला उद्योजकांसमोरील संधी, सध्याच्या बाजारपेठेतील स्पर्धा आणि महिला उद्योजकांनी घेतले पाहिजेत, असे धोरणात्मक निर्णय याविषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी पूजा इंड्स्ट्रीज समूहाच्या सौ. काव्यश्री नलवडे यांनीही स्वतःचा उद्योग निर्मितीचा प्रवास आणि महिला उद्योजकांच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांची माहिती दिली.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. गुरव यांनी व्यावसायिक तसेच औद्योगिक निर्णयप्रक्रियेतील महिलांचा सहभाग तसेच महिलांच्या अंगभूत कौशल्यांचा वापर करून उदयोग-व्यवसाय यशस्वी करून विकसित भारतामध्ये महिला देऊ शकणाऱ्या योगदानाविषयी मार्गदर्शन केले. महिला उद्योजकांसाठी शासनाने अनेक योजना जाहीर केल्या आहेत. त्यांचा लाभ घेण्यासाठी महिलांनी पुढे येण्याची आवश्यकता त्यांनी मांडली.

या कार्यशाळेच्या विविध सत्रांत सौ. वैजयंती एस. काळे (व्यवस्थापकीय संचालक, निना अॅहग्रोटेक प्रा. लि.), सौ. मोनिका शेवाळे (संस्थापक व इव्हेंट प्लॅनर, अवनी इव्हेंट्स, कोल्हापूर), सौ. वृषाली खोत (उद्योजक, श्रीराम गारमेंट ग्रुप) यांनी आपली वाटचाल, संघटन कौशल्य, व्यवसाय वृद्धी आणि नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याच्या संधी याबद्दलचे स्वानुभव कथन केले.

सुरवातीला एसयूके-आरडीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रकाश राऊत यांनी स्वागत केले. एमबीए युनिटच्या संचालक डॉ. दीपा इंगवले यांनी आभार मानले. कार्यशाळेत डॉ. केदार मारुलकर, तेजश्री घोडके, अर्चना मानकर, डॉ. तेजपाल मोहरेकर, परशराम देवळी आदींनी सहभाग घेतला.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here