बचत गटातील महिलांना रिक्षाचे सारथ्य ; मुंबई महानगरपालिकेचा उपक्रम

0
152
Google search engine

प्रसारमाध्यम डेस्क न्यूज

गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन विविध उपाययोजना आणि उपक्रम राबवित असते. महानगरपालिकेच्या नियोजन विभागामार्फत महिला बचत गटांना अर्थसहाय्य केले जाते. या महिलांच्या बचत गटांनी तयार केलेल्या उत्पदनांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळावी, प्रसिद्धी मिळावी तसेच त्यातून महिलांना आर्थिक उत्पन्न मिळावे, यासाठी महानगरपालिका विविध प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते. मुंबई महानगरपालिका, केंद्र सरकार पुरस्कृत दीनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत स्थापन नारी शहर समूह-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि टीव्हीएस यांच्या संयुक्त विद्यमाने कुर्ला येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात बचत गटाच्या एकूण ५० महिलांना रिक्षासाठी बँकांकडून कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्यात आले.


महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना स्वावलंबी बनविणे या उद्देशाने महानगरपालिकेकडून महिलांना रिक्षा वाटप करण्यात आले आहे. तसेच, महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण तसेच शिकाऊ परवाना, कायमस्वरूपी परवाना, वाहन नोंदणी करून देण्यात आली.


आमदार मंगेश कुडाळकर, दिव्याज फाऊंडेशनच्या अध्यक्षा अमृता फडणवीस, महानगरपालिकेच्या नियोजन विभागाच्या संचालक डॉ. प्राची जांभेकर आदींच्या उपस्थितीत महिला बचत गटाच्या सदस्यांना रिक्षांचे वाटप करण्यात आले. कुर्ला येथील नेहरू नगरमधील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये नुकताच हा कार्यक्रम पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे मान्यवरांच्या उपस्थितीत या ५० रिक्षांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या ५० महिलांपैकी बहुतांश महिला भांडूप आणि कुर्ला परिसरातील रहिवासी आहेत.

‘वुमेन्स ऑन व्हील’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत या रिक्षांचे वितरण करण्यात आले. रिक्षा चालक लाभार्थी सविता तावरे यांनी स्वतः रिक्षा चालवत अमृता फडणवीस आणि मंगेश कुडाळकर यांना छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आणले. या कार्यक्रमाला टीव्हीएसचे अधिकारी निशांत दास, अभ्युदय बँकेच्या सहाय्यक महाव्यवस्थापक प्रीती सावंत आदींसह बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बचत गटातील महिलांना सक्षम बनविण्याबरोबर आर्थिक मदत म्हणून राबविलेला उपक्रम सर्वच महापालिकेच्या वतीने राबविण्यात आल्यास महिलांना फार मोठे पाठबळ मिळू शकते. त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here