प्रसारमाध्यम डेस्क
“आईचं मन मोठं आहे.. ती आपल्यासाठी सगळं सहन करते”
अवघ्या १३ वर्षांचा शाम आपल्या आईच्या काळजाचा ठाव घेऊन हा संवाद बोलतो त्यावेळी प्रेक्षकांच्या डोळ्यातून पाणी यायचं.. हा संवाद तितक्याच ताकदीने म्हणणारा शाम आज काळाच्या पडद्या आड झाला..
चित्रपट आणि साहित्य क्षेत्रातील एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि सर्वांच्या परिचित असणाऱ्या ‘शामची आई’ या चित्रपटातील बालकलाकार माधव वझे आज वयाच्या ८६ व्या वर्षी काळाच्या पडद्या आड गेले. ‘शामची आई’ (१९५३) या चित्रपटात शामची भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले होते. या चित्रपटाला भारत सरकारचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.
सन १९५३ साली महाराष्ट्राचे प्रसिद्ध साहित्यिक आचार्य अत्रे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘शामची आई’ हा चित्रपट प्रसिद्ध झाला होता. या चित्रपटात माधव वझे यांनी शामची मध्यवर्ती भूमिका साकारली होती. त्यावेळी त्यांचे वय अवघे १३ वर्षांचे होते.
माधव वझे यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३९ रोजी पुणे इथे झाला. ते १३ वर्षांचे असतानाच त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. १९५३ सालीच त्यांनी ‘वहिनीच्या बांगड्या’ या चित्रपटात सुद्धा बालकलाकार म्हणून अभिनय केला होता. चित्रपट आणि रंगभूमीवर काम करत करत पुण्याच्या नवरोजी वाडिया महाविध्ययलयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून नोकरी सुद्धा केली आहे. निवृत्तीनंतर त्यांनी रंगभूमीवर दिग्दर्शक, नाट्यगुरू आणि समीक्षक म्हणून कार्य केले. २०१३ मध्ये त्यांनी परशुराम देशपांडे यांच्या मराठी रूपांतरित ‘हॅम्लेट’ या नाटकाचे दिग्दर्शन केले, ज्यात कनक दाते आणि नेहा महाजन यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘थ्री इडीयट्स’ २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डिअर जिंदगी’ या हिंदी चित्रपटातून सुद्धा त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. २०१३ मध्ये त्यांनी परशुराम देशपांडे यांच्या मराठी रूपांतरित ‘हॅम्लेट’ या नाटकाचे दिग्दर्शन सुद्धा केले आहे.
माधव वझे यांचे साहित्य क्षेत्रात देखील मोलाचे योगदान आहे. त्यांनी अनेक साहित्यकृती लिहिल्या ज्यात ‘प्रायोगिक रंगभूमी – तीन अंक’ (शांता गोखले यांच्या संपादनाचे अनुवाद), ‘रंगमुद्रा’ (नाट्यकर्मींची व्यक्तिचित्रणे), ‘श्यामची आई, आचार्य अत्रे आणि मी’ (आठवणी), मुलांसाठी ‘नंदनवन’, आणि ‘समांतर रंगभूमी – पल्याड- अल्याड’ यांचा समावेश आहे. त्यांच्या ‘रंगमुद्रा’ आणि ‘प्रायोगिक रंगभूमी’ या ग्रंथांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत.
माधव वझे यांना त्यांच्या नाट्य आणि साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना राज्य नाट्य स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्य पदके मिळाली आहेत. तसेच, ते कला अकादमी (गोवा) येथील नाट्य विभागामध्ये अभ्यागत प्राध्यापक होते आणि आंतरराष्ट्रीय नाट्य समीक्षक संघाचे सभासदही होते. असे बहूआयामी व्यक्तिमत्व असणाऱ्या माधव वझे यांचे आज पुण्यात वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने चित्रपट, अभिनय, रंगभूमी आणि साहित्य क्षेत्रात के पोकळी निर्माण झाली आहे.