कोल्हापूर : प्रसार माध्यम
मे महिन्याच्या आरंभी सार्वजनिक सुट्टी, आठवडाअखेर अशा सलग सुट्ट्यांमुळे मुंबई शहरालगतच्या महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली आहे. उन्हाचा त्रास टाळण्यासाठी मुंबईकरांनी रात्रीच्या प्रवासाला पसंती दिल्याने शहरात रात्रीच्या वेळी वाहतूक कोंडी दिसून येत आहे. मुंबई-पुणे, नाशिक, गोवा, कोल्हापूर-पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा असल्याने प्रवाशांना कोंडीतूनच मार्ग काढावा लागत आहे. याचा फटका कोल्हापुरासह अन्य प्रवाशांना बसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या झळा वाढल्याने रात्रीच्या प्रवासाला प्रवाशांची पसंती वाढत आहे. रात्रीच्या वेळी धावणाऱ्या नियमित आणि विशेष रेल्वेगाड्या, खासगी बसगाड्या, राज्य परिवहनच्या (एसटी) विशेष आणि नियमित रेल्वेगाड्या अशा सर्वांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. नियमित वगळता मागणीनुसार चालवण्यात येणाऱ्या खासगी बसगाड्या, खासगी टुरिस्ट वाहने रात्रीच्या प्रवासाला प्राधान्य देतात. यामुळे पूर्व आणि पश्चिम द्रुतगतीसह शीव-पनवेल, नाशिक महामार्ग, अहमदाबाद महामार्ग अशा शहराबाहेर जाणाऱ्या मार्गावर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे, असे टुरिस्ट वाहन चालक मंगेश मोर्या याने सांगितले.
८ ते १० किमीच्या रांगा
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळा-खंडाळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या ८ ते १० किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. एरव्ही घाटमार्ग पार करण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा वेळ अपेक्षित असतो. कोंडीमुळे घाट मार्ग पार करण्यासाठी २ ते ३ तास लागत होते. मुंबई-पुणे दरम्यान निर्माणाधीन असलेला मिसिंग लिंक प्रकल्प तातडीने पूर्ण करावा आणि वाहतुकीसाठी खुला करून द्रुतगती मार्गावरील कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करावा, अशी प्रतिक्रिया खासगी बसचालक राजेंद्र सिंग यांनी दिली.
प्रकल्प कामांमुळे वेग मंदावला
मुंबई ते नाशिकदरम्यान, कोल्हापूर ते पुणे दरम्यान महामार्ग विस्ताराचे काम सुरू आहे. प्रकल्प कामांमुळे दिवा, कल्याण फाटा, माणकोली परिसर कोल्हापूर ते पुणे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्याचा फटका वाहनचालकांना बसत असून, वाहनाचा वेग मंदावला आहे.
रेल्वे तिकीट मिळत नसल्याने रस्ते प्रवास
उन्हाळी सुट्टीनिमित्त मुंबई-कोकण मार्गावर रेल्वे प्रशासनाने नियमित आणि विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा केली आहे. मात्र, प्रत्यक्षात दोन्ही गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. तत्काळ तिकीटही उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. दरम्यान, अनधिकृत दलालांकडून कन्फर्म रेल्वे तिकिटांची चढ्या दराने विक्री होत आहे. रेल्वे तिकीट मिळत नसल्याने प्रवाशांना रस्तेमार्गे प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.