जोतिबा: आज श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे जोतिबाच्या दर्शनासाठी भाविकांनी लाखोंच्या संख्येत गर्दी केली होती. चांगभलं चा गजर , गुलाल खोबऱ्याची उधळण आणि ढोल ताशांचा निनाद यामुळे या रविवारला मिनी चैत्र यात्रेचे स्वरूप प्राप्त झालं होत. या रविवारी सुद्धा जोतिबा मंदिरात मोठ्या संख्येने सासनकाठ्या आल्या होत्या.
जोतिबा डोंगर येथील चैत्र पौर्णिमेची यात्रा शनिवार दिनांक १२ एप्रिल रोजी पार पडली. चैत्र यात्रेनंतर येणारा हा दुसरा रविवार असल्याने भाविकांनी या दिवशी जोतिबा डोंगरावर प्रचंड गर्दी केली होती. ज्या भाविकांना चैत्र यात्रेला काही कारणास्तव यायला जमले नव्हते त्या भाविकांनी आज श्री जोतिबाचे आपल्या सासनकाठी सहित दर्शन घेतले. शनिवारी रात्री पासूनच भाविक मोठ्या संख्येने जोतिबा डोंगरावर दाखल होत होते. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत दक्षिण दरवाजा परिसरापर्यंत दर्शन रांग लागली होती. आज पहाटे चार वाजता घंटानाद होऊन मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. यानंतर मंदिरातील नित्य धार्मिक विधी पार पडल्या. सकळी ८ वाजता श्रींना अभिषेक करण्यात आला यानंतर श्री जोतिबाची सरदारी स्वरूपातील खाडी अलंकारिक पूजा बांधण्यात आली. सकाळी ११ वाजता धुपारती सोहळा संपन्न झाला. रात्री ८ : ३० वाजता पालखी सोहळ्यास सुरवात झाली. या पालखी सोहळ्यात सासनकाठ्या सहभागी झाल्या होत्या.
दरम्यान आज जोतिबा डोंगरावरील सर्व परिसर वाहनांनी पूर्णपणे भरलेले होते. दुपारी दोन वाजेपर्यंत येणाऱ्या भाविकांना वाहने पायथ्यालाच लावून डोंगरावर चालत यावं लागलं. रविवारची होणारी गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता. कोडोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर आणि परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दर्शन रांगेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्था समितीच्या वतीने अंबाबाई मंदिरातील सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली होती.