spot_img
मंगळवार, सप्टेंबर 23, 2025

9049065657

Homeराजकीयजहान-ए-खुसरो: दिल्लीतील विश्व सुफी सांस्कृतिक महोत्सवाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

जहान-ए-खुसरो: दिल्लीतील विश्व सुफी सांस्कृतिक महोत्सवाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

‘जो डूबा सो पार ‘ हे शब्दच हजरत अमीर खुसरो यांच्या कवितेतील भावूकता स्पष्ट करण्यास पुरेसे आहेत. सुमन मिश्र यांचे अमीर खुसरो या संपादित पुस्तकाचे मुखपृष्ठ.

सूफी पंथाचे फकीर लोकरीची घोंगडी पांघरून सूफी शिकवणीचा प्रसार करत असत. अभिजात सूफी विद्वानांनी सूफी म्हणजे मनाची ( जे अनेक विकारांचे उगमस्थान आहे ) सुधारणा व जीवनात सर्व लक्ष ईश्वराकडे केंद्रित करणे असे मानले आहे. अहमद इब्न अबीजा या सूफी गुरूच्या मते सूफी म्हणजे दिव्यत्वा कडे करायची वाटचाल, अंतर्मन शुद्धीचा मार्ग.

भारतीय गूढवादाचे अलिकडचे भाष्यकार ओशो रजनिश यांच्या मते सूफी ही बाहेरील लोकानी केलेले नामकरण. ते म्हणतात सूफीवाद म्हणजे परमेश्वराशी, मानवी जीवनातील अंतिम सत्तेशी, समग्रतेशी असणारे प्रेम प्रकरण. सूफी पंथाची शिकवण ही ईहवादाविरोधी आहे. अंतर्मुखतेला महत्व देणारी आहे. ध्यानाची आहे. जहान – ए – खुसरो हा सांस्कृतिक व सांगीतिक महोत्सव ज्यांचे नावे आहे त्या खुसरो यांचा जीवनकाल 13 व्या शतकातला. दोन संस्कृतीतील देवाण घेवाण आणि हिंसक आक्रमणे सुरू होऊन तेव्हा संस्कृतीची सरमिसळही सुरू झाली होती .

अमीर खुसरो यांचा जन्म उत्तर प्रदेशातील पटीयालीचा! त्यांचे वडील अमीर सैफूद्दीन महमुद हे तुर्कस्तानातील सरदार होते तर आई भारतीय होती . सुलतान अलतमाश यांच्या काळात ते हिंदूस्थानात आले. अबूल – हसन यामीन उद-दीन हे अमीर खुसरो यांचे मूळ नाव. ते 8 वर्षांचे असताना सूफी हजरत निजामउद्दीन औलिया यांचे शिष्य बनले.10 वर्षाचे ते असताना पित्याचे छत्र हरपले व त्यांच्या आईच्या वडीलांनी – आजोबांनी त्यांचे पालनपोषण केले.

अमीर खुसरोंचे कविता करणे लहानपणा पासूनच सुरू झाले. ताल, सूर, शब्द आणि भावुकता विशेषत: भक्तीची, यांचा संगीतमय उत्कट मिलाफ त्यांच्या जीवनात पाहायला मिळतो. या श्रेष्ठ दर्जाच्या अभिजात कवि व संगीताच्या जाणकाराला दिल्लीच्या राजदरबारी राजकावी म्हणून मान्यता मिळाली नसती तरच नवल. केवळ भारतातच नव्हे तर देशाबाहेर ही त्यांच्या प्रतिभेचा बोलबाला होता. इराणच्या फार्सी विद्वानांनी तर त्यांचा तुती-ए-हिंद म्हणून गौरव केलेल्या होता. बादशहा जलालउद्दीन फिरोज खिलजीने खुसरो यांच्या कवितेवर खुश होऊन ‘अमीर’ ही पदवी दिली.

दिल्लीचा नववा सुलतान घीयास ऊद-दीन बलबन याच्या दरबारात असलेल्या भारतीय राजघराण्यातील व युद्धमंत्री असलेल्या रावत आरज यांच्या कन्येशी बीबी दौलतनांज हीच्याशी त्यांचा विवाह झाला. 13 व्या शतकात खुसरो यांनी यमन कल्याण, काफी, बहार, झीलफ, सांजगिरी अशा अनेक रागांची निर्मिती तर केलीच शिवाय सूफीभक्तिधारेची प्रसिद्ध ‘कव्वाली’ ची निर्मितीही केली. खुसरो हे भारतीय संगीत व जीवनाशी समरस झाले होते. कव्वालीच्या सुरुवातीच्या काळातील त्यांच्या अनेक रचनांचे समकालीन हिन्दी भक्ति कवि जयदेव यांच्या श्लोक पठण करण्याच्या शैलीशी साम्य आहे.

खुसरो यांना उर्दू तील गझल, रुबाया, कव्वालीचे जनक मानले जाते. खुसरो यांनी तीन तारांच्या त्रितंत्री वीणेला विकसित करून सेहतार असे नाव दिले जे कालांतराने सतार म्हणून ओळखले जाऊ लागले असाही प्रवाद आहे. ज्या विषयी निश्चित पुरावे उपलब्ध नाहीत.इसवीसन 1325 ला अमीर खुसरो यांचे निधन झाले. दिल्लीतील निजामुद्दीन दर्ग्यात त्यांच्या आध्यात्मिक गुरुच्या कबरीशेजारीच त्यांची कबर आहे.

प्रधानमंत्री मोदी या सुफी विश्व संगीत महोत्सवाच्या उद्घाटना वेळी बोलताना म्हणाले की सुफी संगीतात भारताच्या मातीचा सुगंध मिसळलाआहे. अमीर खुसरो यांनी भारतास स्वर्ग म्हटले होते व मानवाच्या वसाहतीतील हिंदुस्तान हा सर्वात सुंदर बगीचा! सुफी पंथातील बाबा फरीद यांची आध्यात्मिक शिकवण, हजरत निजामुद्दीन यांची प्रेमाची शिकवण आणि अमीर खुसरो यांचे त्या काळातील नवीन शब्द वैभव हे सर्व भारताच्या सांस्कृतिक वैभवाचे जणू संचितच सांगत होते. सुफी संतांनी कुराणातील शिकवण आणि वेदातील तत्वे यांची एकत्र गुंफण केली. प्रेम आणि भक्ती यांच्या नवीन भावना व्यक्त केल्या त्या अमीर खुसरो यांचे कव्वालीत दिसून येतात. बुल्लाहशा, मीर, कबीर, रहीम, रास खान यांचे काव्य, भक्ती उल्लेखनीय आहे. रसखान मुस्लिम असूनही कृष्णाचा परमभक्त होता. अमीर खुसरो यांनीही संस्कृत जगातील सर्वोत्कृष्ट भाषा असल्याचा उल्लेख केलेला होता. रूमी फाउंडेशन द्वारा आयोजित या महोत्सवाची सुरूवात 2001 मधे प्रसिद्ध फिल्म निर्माता आणि कलाकार मुजफ्फर अली यांनी केली होती. हे 25 वे वर्ष आहे.

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments