कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार राजेश शिरसागर यांनी लेखी तक्रार केली होती. यावर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त यांना दिल्या आहेत.
जयप्रभा स्टुडिओच्या जतन, सुशोभिकरण्यासाठी आवश्यक निधीचा मागणी प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासकांना दिल्या आहेत. कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ या सिनेसृष्टीच्या वारशाला पुन्हा उभारी देण्याकरता पूर्ववत पूर्ण क्षमतेने चित्रीकरण होण्यासाठी या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन, सुशोभीकरण आणि चित्रीकरणासाठी अत्याधुनिक यंत्रणा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक कोटी रुपये निधीची तरतूद करावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर गेल्या आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्रा द्वारे केली होती, यावर शिंदे यांनी वरील सूचना महापालिका आयुक्त यांना दिल्या आहेत.
जयप्रभा स्टुडिओ पूर्ण क्षमतेने कार्यरत करण्यासाठी आणखी दहा कोटींचा निधी मिळाव, अशी मागणी करणार आहे. येत्या काळात कलेच्या या माहेरघरात कलाकारांचा आणि चित्रीकरणाच्या ओघ पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येईल, असा विश्वास राजेश शिरसागर यांनी व्यक्त केला
जयप्रभा स्टुडिओ व इतिहास
कोल्हापूरची अस्मिता आणि भालजी पेंढारकर यांच्या कार्याची एकमेव आठवण असलेल्या जयप्रभा स्टुडिओची विक्री झाल्याची माहीती समोर आली. १५ फेब्रुवारी २०२० मध्येच जयप्रभा स्टुडिओची ही जागा तुकडे पाडत अनेकांना विकल्याचे समोर आले. ६ कोटी ५० लाखांना हा व्यवहार झाला. मात्र, ज्या कोल्हापूरकरांनी लता मंगेशकर यांच्याविरोधात जाऊन जागा विक्री विरोधात लढा दिला होता. त्याच कोल्हापूरकरांच्या डोळ्यात धूळ फेकत ही जागा विक्री झाल्याचे उघड झाले.
अनेक वर्षांचा लढा अन् सर्वांना अंधारात ठेऊन जयप्रभा ची विक्री
जयप्रभा स्टुडिओ आणि येथील एकूण १३ एकर जागा भालजी पेंढारकर यांनी विकत घेतली होती. त्यामध्ये अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले. अनेक दिग्गज कलाकार याठिकाणी येऊन गेले. अनेकांच्या करिअरची सुरुवात या जयप्रभा स्टुडिओमधूनच झाली. सर्वकाही ठीक सुरू होते. त्याच काळात महात्मा गांधी यांची हत्या झाली आणि त्याचे पडसाद संपूर्ण देशभर पाहायला मिळाले. याच वेळी जयप्रभा स्टुडिओ सुद्धा जाळण्यात आला. यात स्टुडिओचे प्रचंड नुकसान झाले. भालजीनी आपल्या कमाईचे सर्व पैसे जयप्रभा पुन्हा उभा करण्यासाठी लावले. शिवाय अनेक ठिकाणाहून कर्जही काढले. मात्र, पुढे त्यांच्या डोक्यावर कर्ज झाल्याने शेवटी हा स्टुडिओ त्यांनी त्यांच्या जवळच्या असणाऱ्या मंगेशकर कुटुंबाला विकायचे ठरवले आणि लता मंगेशकर यांनी त्यांच्याकडून हा स्टुडिओ आणि १३ एकर जागा विकत घेतली. विकताना या ठिकाणी केवळ चित्रपट निर्मितीचे काम सुरू राहावे अशी अट त्यांनी घातली होती. त्यानुसार चित्रपट निर्मितीचे काम सुरू राहीले. तेवढ्यात भालजी पेंढारकर यांचे निधन झाले आणि पुढे जयप्रभा स्टुडिओमध्ये चित्रपट निर्मितीचे काम सुद्धा थांबले. पुढे कित्येक वर्षे हा स्टुडिओ बंदच होता.
पुढे लता मंगेशकर यांनी एकूण १३ एकर जागेपैकी साडे नऊ एकर जागा विकासकाला विकली. त्या ठिकाणी सध्या मोठ्या इमारती उभ्या आहेत. मात्र त्यातील उरलेली साडेतीन एकर जागा तशीच होती. पुढे महानगरपालिकेने शहरातील अनेक जागा, वास्तू हेरिटेज वास्तू मध्ये नोंद केल्या. यामध्ये जयप्रभा स्टुडिओच्या जागेचा सुद्धा समावेश होता. लता मंगेशकर या निर्णयाविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्या. मात्र मंगेशकर यांच्या या भूमिकेनंतर संतापलेल्या कोल्हापूरकरांनी मात्र आंदोलन पुकारले. शिवाय जिथे चित्रपटांचा पाया रचला गेला त्या जागेची पुढे जाऊन विक्रीच होणार यामुळे ही जागा अशीच राहावी, अशी विनंती सुद्धा कोल्हापूरकरांनी केली. यासाठी मोठे आंदोलन उभे राहिले, अनेक वर्षे ते चालले. महापालिकेला पाठिंबा देत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने सुद्धा यामध्ये सहभाग नोंदविला. शेवटी २०१७ झाली लता मंगेशकर यांनी स्वतः सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली होती. मात्र, त्यानंतर सर्वांनाच अंधारात ठेऊन पुन्हा ही जागा विक्रीची प्रक्रिया सुरू केली आणि २०२० मध्ये ज्यावेळी जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू होता त्याच्या सुरुवातीलाच जागेची विक्री झाल्याचे समोर आले आहे. एकूण ६ कोटी ५० लाखांना कोल्हापूरातील जुना वाशी नाका येथील एका भागीदारी फर्मने ही जागा विकत घेतली असून यामध्ये अनेकांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. यात शहरातील एका राजकीय नेत्याच्या दोन मुलांचा सुद्धा सहभाग आहे.